गडचिरोली : सध्या जिल्हाभरात हिवताप आणि डेंग्यूसारख्या आजाराने थैमान घातले आहे. त्यात दुर्गम आदिवासी भागात रुग्णाचे प्रमाण अधिक असल्याने तात्काळ उपाययोजनेची गरज आहे. परंतु दुर्गम भागातील काही आरोग्य कर्मचाऱ्यांना गरज नसताना जिल्हा मुख्यालयी प्रतिनियुक्ती देण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्यापेक्षा कर्मचाऱ्यांची सुविधा महत्त्वाची आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र नवे नाही. अपुऱ्या सोयी आणि रस्ते यामुळे अनेकदा येथील रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही. सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळेदेखील नागरिकांना आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागते. एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा तालुके अतिसंवेदनशील असल्याने प्रशासनाकडून त्याभागात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून त्याभागातील काही निवडक आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्हा मुख्यालयी प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी अशाचप्रकारे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याचे चित्र आहे. आजघडीला दक्षिण गडचिरोली भागात डेंग्यूची साथ पसरली आहे. जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक रुग्णाची नोंद करण्यात आले. यामुळे काही मृत्यूदेखील झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे हिवतापाचे रुग्ण हजाराच्या संख्येत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास अनेकांना जीव गमवावा लागू शकतो. याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. परंतु दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना जिल्हा मुख्यालयी प्रतिनियुक्ती दिल्याने त्याठिकाणी पदे रिक्त आहेत. परिणामी आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहे.
हेही वाचा – गोसीखुर्द प्रकल्पाला निधीची प्रतीक्षाच; कामे साडेसातशे कोटींची, मिळाले अडीचशे कोटी
भामरागड आश्रमशाळा आरोग्यपथक डॉक्टरविना
राज्यात हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू भामरागड तालुक्यातील होतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा भाग अतिसंवेदनशील आहे. अशा स्थितीत येथील आश्रमशाळा आरोग्यपथकात वैद्यकीय अधिकारी अद्याप रुजू झाले नाही. त्यामुळे आश्रमशाळा आरोग्यपथक केवळ कागदावरच उपलब्ध आहे. या परिसरातील सर्वाधिक आदिवासी विद्यार्थी निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेतात. अशात हिवतापाने डोके वर काढल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा – भंडारा : येराली येथील आश्रम शाळेत ४० विद्यार्थ्यांना विषबाधा
प्रतिनियुक्ती संदर्भात माहिती मागवली आहे. लवकरच यावर एक बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. – आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली