यवतमाळ : घाटंजी नगर परिषद इमारतीसह शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग लागले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. शहरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे घाटंजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन वातीले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यवतमाळ येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
घाटंजी शहराला नगर परिषदेचा दर्जा देऊन शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, या उदात्त हेतूने शासनाने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहे. शहरातील प्रत्येक वार्डातील लोकांचे आरोग्य, पाण्याची समस्या, अंतर्गत रस्ते, विद्युत दिवे देखभाल, नाल्या सफाई या सर्व समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर सोपवली आहे. परंतु, घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी याला अपवाद ठरत असल्याचा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. घाटंजी नगर परिषदेचा कारभार तुघलकी स्वरुपाचा सुरु आहे. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग लागले आहे. नालेसफाई करण्यात न आल्याने दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात शहरातील अनेक भागात पुराचे पाणी घुसत असल्याने नालेसफाई करणे गरजेचे असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. घाटंजी शहरातील नागरिकांची तहान भागविण्याकरीता अमृत योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे कामसुद्धा संथ गतीने सुरु आहे. रस्त्यावर नाल्या खोदून ठेवल्यामुळे अनेकांचे अपघात झाले आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करुन लावलेले तिरंगी लाईट्ससुद्धा बंद असल्यामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहे. या सर्व बाबींकडे मुख्याधिकारी लक्ष देत नसल्यामुळे प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन वातीले यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार परीषदेला प्रहारचे बिपीन चौधरी, शुभम उदार, सागर मोहुर्ले, सुजीत बिवेकार उपस्थित होते.
हेही वाचा – “मला कोणाची रसद घेण्याची गरज नाही”, ठाकरेंचा राऊत यांना टोला
हेही वाचा – नागपुरात सूर्य आग ओकतोय, पण उष्माघात नाहीच! नागपूर महापालिका म्हणते…
कारवाई न केल्यास आंदोलन
घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू मोत्तेमवार कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक देतात. त्यांनी कामगार दिनाच्या पर्वावर कामगारांना कामावरुन काढून टाकले, ही दुर्देवाची बाब आहे. शहरात सुरु असलेल्या अनेक कामांमध्ये गैरप्रकार सुरु आहे. त्यामुळे सरकारने या सर्व कामांची चौकशी करुन मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन वातीले यांनी दिला आहे.