नागपूर : राज्यातील अवकाळी पावसाचे सावट दूर झाले, तसेच बहूतांशी भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढला. विदर्भात तुलनेने तापमान अधिक असून शनिवारी उपराजधानीत सर्वाधिक ४४.७ अंश सेल्सिअस इतकी कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. या तापमानासह नागपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती निर्माण होणार आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या बहूतांश भागात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल. त्यामुळे नागरिकांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन नये, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. विदर्भात तापमानाचा आलेख उंचावून उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण होईल, असेही या अंदाजात सांगितले होते. हा इशारा आता प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारीच त्याची प्रचिती आली आणि राज्याच्या बहूतांश भागातील तापमानाचा पारा चांगलाच वाढला.
राज्यात गेले दोन आठवडे वादळी पावसाचे वातावरण होते. त्यामुळे वातावरणात बरेच चढउतार झाले. दिवसा ऊन तर रात्री पाऊस अशी स्थिती राज्याच्या बहूतांश भागात होती. सरासरी तापमानातही काहीशी घट झाली. मात्र, आता पावसाचे वातावरण निवळले आणि तापमानाचा पारा वेगाने उंचावला. शनिवारी विदर्भातील चार जिल्ह्यात पारा ४४ अंश सेल्सिअसपलीकडे होता. तर तीन जिल्ह्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसपलीकडे गेले. मध्य महाराष्ट्रात देखील मालेगाव येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मराठवाड्यात परभणी येथे सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि कोकण वगळता राज्यातील सर्वच भागात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.
अलीकडच्या काही उन्हाळ्यापेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र जाणवत आहे. सकाळी नऊ-दहा वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यान्हापासूनच यंदा उन्ह तापण्यास सुरुवात झाली. तर मार्च संपण्याआधीच उष्णतेच्या दोन लाटा येऊन गेल्या. राजस्थानमध्ये गत काही दिवसांपासून उष्णतेची लाटसदृश स्थिती आहे. राजस्थानमधील उष्ण वारे गुजरातवरून राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवसांचा तापमानाचा इशारा दिला आहे.
नागपूर – ४४.७
अकोला – ४४.३
चंद्रपूर, वर्धा – ४४
अमरावती – ४३.८
ब्रम्हपुरी – ४३.६
यवतमाळ – ४३.५
परभणी – ४३.६
मालेगाव – ४३