नागपूर : राज्यातील उष्णतेचा पारा वाढतच चालला असून कमाल तापमानाने पुन्हा एकदा चाळीशी गाठली आहे. राज्यातील सोलापूर येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहचले असून विदर्भातील काही शहरांमध्ये पारा चाळीशीच्या जवळ पोहचला आहे. त्यातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही शहरांना “येलो अलर्ट” देण्यात आला आहे. विशेषकरून कोकण विभागातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा “येलो अलर्ट” देण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला आणि ब्रम्हपुरी या शहरांमध्ये अनुक्रमे ३९.५ व ३९.४ अंश सेल्सिअस इतके तापमान रविवारी नोंदवले गेले. तर चंद्रपूर येथेही ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गोंदिया वगळता उर्वरित शहरांमध्ये तापमान 3३७ अंश सेल्सिअस पलीकडे होते. त्यामुळे येत्या काही दिवसात तापमानाचा पारा चाळीशी ओलांडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही शहरांत देखील तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. दरम्यान, आज सोमवारी देखील महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तापमान वाढ दिसून येणार आहे. पुण्यातील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. कालच्या तुलनेत आज सकाळपासूनच तापमानात वाढ दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ते ४० अंश सेल्सिअस पलीकडे जाण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज तापमान ३९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ अंश पर्यंत जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सांगलीतील कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. आज दुपारी किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोलापूरमधील तापमान आधीच ४० अंश सेल्सिअस पलीकडे गेले आहे. त्यात आणखी वाढ होऊन ते ४२ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस असून त्यातदेखील वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोल्हापूर येथेही तापमानात वाढ होऊन कमाल तापमान ३८ अंश तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात बहुतांश वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Story img Loader