नागपूर : विदर्भात उष्णता वाढतच चालली आहे. मात्र, असे असतानाही फेब्रुवारी २०२५ मध्ये किमान तापमानाचा १२४ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला गेला. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात म्हणजेच मध्यभारतात १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये १६.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. यात १.७३ अंशाची विसंगती होती, ज्यामुळे फेब्रुवारी महिना १९०१ नंतर सर्वात उष्ण ठरला.
१९०१ नंतर फेब्रुवारीमध्ये मध्य भारतातील सरासरी तापमान २४.६ अंश सेल्सिअस होते.दरम्यान, भारतीय हवामान खात्याने उष्णतेची सुरुवात यंदा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली आहे. साधारणपणे होळीनंतर भारतात उन्हाळ्याला सुरुवात होते. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यान्हातच उन्हाच्या झळा सुरु झाल्या. त्यामुळे उन्हाची दाहकता, उष्णतेच्या लाटा देखील लवकरच जाणवतील, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भात अवकाळी पाऊस सामान्यपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा शेवट कोरडा झाला, कारण पावसाची कमतरता उणे ८९ टक्के होती. मध्य भारतात १४.६ मिलीमीटरच्या सरासरीच्या तुलनेत १.६ मिलीमीटर पाऊस पडला. या फेब्रुवारीमध्ये या प्रदेशातील कमाल तापमान आता एकूण चौथ्या क्रमांकावर आहे. या प्रदेशात ३२.४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामध्ये १.९४ अंश सेल्सिअसची विसंगती होती. २०२३ मध्ये नोंदवलेले फेब्रुवारीचे सर्वोच्च कमाल तापमान ३२.५९ अंश सेल्सिअस होते. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यासारखी उष्णता जाणवू लागली.
जरी कमी होत चाललेला हिवाळा तापमानाला आरामदायी ठेवेल अशी अपेक्षा आहे. यावर्षी हिवाळ्यात थंडीची लाट अशी नव्हतीच. तर बहुतांशवेळा रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होते, असेही भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. मार्च ते मे या कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. उन्हाळ्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा दोन ते तीन अंशांनी जास्त असण्याची अपेक्षा आहे. मान्सूनपूर्व महिन्यांत पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. हिंदी महासागरातील द्विदल आणि एल-निनो दक्षिणी दोलनामुळे तापमानात वाढ झाली आहे. या मोठ्या प्रमाणात वातावरणीय घटना आहेत, ज्यामुळे कमाल तापमानात वाढ होते. शहरातील उष्णतेस कारणीभूत असणारे घटक, कार्बन उत्सर्जन आणि इतर हवामान बदल घटक यामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.