नागपूर : राज्यासह विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यात नागपूरचाही क्रमांक वरचाच आहे. दरम्यान नागपुरात आता हळू- हळू उन्हाचा तडाखा वाढत आहे. नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी महापालिकेकडून काही उपाय करण्यात आले आहे. या उपायांबाबत आपण जाणून घेऊ या.
उन्हाळ्यात नागपूर शहरातील तापमाण ४६ अंशाहून जास्तवर जाते. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना प्रचंड मन:स्ताप करावा लागतो. उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर उष्माघाताचाही धोका बळावतो. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्याबाबत काही योजनेवर काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आता नागपुरात उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नागपूरकरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी शहरातील सर्व शहर व एसटी महामंडळाची बस स्थानक, पेट्रोल पंप, बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसंगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली जात आहे. बाजारपेठ असोसिएशनशी चर्चा करून बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी जागा निश्चित करूनही तेथे शुद्ध पिण्याची सोय केली जात आहे. शहरातील सर्व उद्याने दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत सुरु ठेवले जाणार आहे. सोबत रस्त्यांवर टँकरच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करून उकाड्याची तिव्रता कमी केली जाईल. शहरातील महत्वाच्या चौकात ग्रीन नेट लावण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना थेट उन्हाच्या झळा बसणार नाही.
शहरातील विविध बांधकाम ठिकाणी कामगारांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका संबंधित कंत्राटदारांना संपर्क करून सोय करण्याची सूचना करेल. रस्त्यावरील प्राण्यांकरिता आणि पक्षांकरिता महानगरपालिकेच्या विविध इमारती, शाळा या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्यानांमध्येही पक्ष्यांकरिता पाणी उपलब्ध होईल अशी सुविधा तयार करावी तसेच रस्त्यावरील प्राण्यांकरिता शेल्टर होम तयार करण्यात येणार असल्याचाही नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे.
रुग्णालयांमध्ये शित कक्षाची स्थापना
नागपुरात उष्माघाते रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर झटपट उपचारासाठी नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काही महापालिकेच्या रुग्णालयांतही शित कक्ष स्थापन करून तेथे रुग्णशय्या सज्ज ठेवल्या जात आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) शित कक्ष स्थापन करून तेथेही या रुग्णांवर तातडीने उपचाराची सोय केली जात आहे. त्यासाठी आवश्यक औषधांची खरेदी करण्यात आली आहे. तर गरजेनुसार रुग्ण वाढल्यास येथे रुग्णशय्या वाढवण्याचीही प्रशासनाची तयारी असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.