नागपूर : राज्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढत चाललाय. विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र याठिकाणी ऊन चांगलेच तापत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला कमाल व किमान तापमानात काहीशी घट व्हायला सुरुवात झाली होती. काही दिवस ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी गार वारे वाहत होते. हवामान खात्याने याकाळात पावसाचा इशारा देखील दिला होता. मात्र, आता पुन्हा तापमानात बदल झाला आहे. आता पावसाचा नाही तर थेट उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उष्णतेची ही लाट कोकणात असून रत्नागिरी,रायगडसह मुंबईकरांना देखील वाढत्या तापमानाने सध्या चांगलाच घाम फोडलाय.
राज्यात कुठे व कसे तापमान?
राज्यात फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच तापमान ४० अंश सेल्सिअस पुढे गेले होते. त्यानंतर आणखी एक-दोनदा तापमानाने चाळीशी पार केली. त्यानंतर तापमानात बदल झाले असले तरीही तापमान फार कमी झाले नाही. राज्यात बहुतांश ठिकाणी ३५ अंश सेल्सियसच्या पुढे पारा जात आहे. राज्यात सर्वाधिक ३८.८ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये नोंदवले गेले. विदर्भात बहुतांश ठिकाणी पारा ३६ अंशांच्या पुढे गेला. वाशिम ,अकोला,अमरावती, वर्धा या जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
उष्णतेचा “येलो अलर्ट” कुठे ?
राज्यात पुढील पाच दिवस महत्त्वाचे राहणार असून तापमानाचा उच्चांक पहायला मिळणार आहे. तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. पुढील पाच दिवस मुंबई व उपनगरात तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा “येलो अलर्ट” देण्यात आलाय. आज’ नऊ मार्चला ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट आहे. साधारण ११ मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा असून त्यानंतर उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम राहणार आहे.
इतर राज्यात स्थिती काय?
तमिळनाडू आणि आजूबाजूच्या भागात चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिणेत केरळमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा आहे. तसेच ईशान्येकडील राज्यांनाही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. उर्वरित देशात कोरडे व शुष्क वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानाचा पारा ही वाढला आहे. सध्या पश्चिमी चक्रवात इराकच्या दिशेने असल्याने हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांना काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकण व गोवा तसेच मुंबईत उष्णतेची लाट असल्याचे वर्तवण्यात आले आहे.