नागपूर : महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद ब्रम्हपुरी या शहरात झाली. तर अनेक शहरांमध्ये तापमान ४०, ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. गुजरात व राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमधील १७ शहरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. गुरुवारपासून गुजरात व लगतच्या राजस्थान आणि पश्चिम किनारपट्टीच्या कोकण भागात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असली तरी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. महाराष्ट्रात विदर्भात १४ मार्चपर्यंत, ओडिशात १६ मार्चपर्यंत, झारखंडमध्ये १६ मार्चपर्यंत आणि पश्चिम बंगालमध्ये १८ मार्चला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील आठवड्यात मध्यप्रदेशात देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम राजस्थान यासह संपूर्ण पश्चिम भारतातही पुढील चार ते पाच दिवसांत दोन ते तीन अंशांनी घसरण होण्याची शक्यता आहे. तर छत्तीसगडसह मध्य भारतातील कमाल तापमानात पुढील तीन दिवसांत किमान दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमान स्थिर राहील. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह पूर्व भारतात कमाल तापमान किमान पाच अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

सहा राज्यांमध्ये वादळाची शक्यता

पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये पुढील आठवडाभरात जोरदार वारे आणि धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील तेलंगणामध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेची लाट होती. १८ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. मध्य भारतातील छत्तीसगडमध्ये तीन दिवसात तापमान दोन अंशांने वाढण्याची शक्यता आहे.

Story img Loader