वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील बाबापूर शिवारातील एका पोल्त्री फार्ममधल्या दीड हजारावर कोंबड्या उष्माघाताने ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सागर पचगडे या युवा शेतकऱ्याने हिंमतीने उभ्या केलेल्या व्यवसायास एकाच दिवसात पाच लाख रुपयांचा फटका बसला आहे.
वर्धा जिल्ह्याचे तापमान सध्या चांगलेच वाढत आहे. त्याची झळ पशूपक्ष्यांना सुद्धा बसू लागली आहे. पचगडे यांचा सात हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे हिरवे आच्छादन असून स्प्रिंकलरने त्यावर पाणी शिंपडले जात असते. मात्र, एक जूनला भारनियमन करण्यात आल्याने ते बंद पडले. त्यातच जनरेटर मधील डिझेल संपल्याने पर्याय उरला नव्हता.
दोन जूनपासून कोंबड्यांनी माना खाली टाकायला सुरवात केली. त्या दिवशी रात्रीतच एक हजारावर कोंबड्या ठार झाल्या. आज सकाळपर्यंत सोळाशे कोंबड्या मृत झाल्याचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. व्ही. वंजारी यांनी सांगितले. मृत कोंबड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. यावेळी वीज खंडित करण्यात आल्याने ही घटना घडल्याचा दावा पचगडे यांनी केला आहे.