नागपूर : विदर्भाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळला. एकीकडे पावसाचा कहर सुरू असताना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज कोसळून पाच ठार, तर २७ जण जखमी झाले. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ येथे भाताची लागवड करताना वीज कोसळून २० महिला आणि पुरुष जखमी झाले. या घटनेला काही तास उलटत नाही तोच मोहाडी तालुक्यातही सहा महिलांच्या अंगावर वीज कोसळली. त्यापैकी दोघींचा जागीच मृत्यू झाला.
जखमी झालेल्या चार महिलांना करडी आणि तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळात मोहाडी तालुक्यातील बोंद्री येथे शेतात रोवणीचे काम सुरू असताना वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि देवरी तालुक्यातील शेतशिवारात वीज कोसळून एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला, तर तीन शेतकरी जखमी झाले. जखमींना देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे मारेगाव येथील अनेक घरांत पाणी शिरले. वर्धा जिल्ह्यातही संततधार सुरू आहे. तेथील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे जलाशयाची पातळी वाढली. त्यामुळे प्रकल्पाचे सहा दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही पावसामुळे घाटाखालील तालुक्यात नुकसान झाले. २४४ गावातील ९२ हजार २१३ हेक्टरवर पिकांची नासाडी, तर १०० घरात पाणी शिरल्याने कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.
पावसाचा जोर उद्यापर्यंत
पुणे : राज्यात रविवापर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून शनिवारी पुणे आणि पालघरला ‘रेड अॅलर्ट’, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिमला ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे झुकला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. दक्षिण छत्तीसगडमध्येही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून रविवार, २३ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील. – अनुपम कश्यपी, शास्त्रज्ञ, हवामान विभाग
मुंबईत जोरदार
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी दुपारी १२ नंतर पावसाचा जोर वाढला. कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. परिणामी, सखलभाग जलमय झाले, रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आणि रेल्वे वाहतूकही मंदावली होती. हार्बर मार्गावर पाणी साचल्याने काही काळ लोकलचा खोळंबा झाला.