गडचिरोलीत १०० गावांचा संपर्क तुटला
बरसणाऱ्या पावसातच गुरुवारी विदर्भात गणरायाचे जल्लोशात आगमन झाले. जूनच्या सुरुवातीला बरसलेल्या मुसळधार पावसाप्रमाणेच गेल्या दोन दिवसांपासून त्याने जोर धरला आहे. या पावसाने शेतकरी सुखावला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील १०० गावांचा संपर्क तुटला असून, वीजपुरवठा व मोबाइल सेवा ठप्प झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासूनचा हा पाऊस खऱ्या अर्थाने मान्सूनची आठवण करून देत आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश येथे तापमानात वाढ झाल्याने नैर्ऋत्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हा पाऊस केवळ मध्य भारतातच असल्याचे हवामानाचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये असाच पाऊस कायम राहील आणि १५ ऑक्टोबपर्यंत परतीचा पाऊस राहील, असा अंदाज त्यांनी वर्तविला.
नागपूर शहरात बुधवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासून वेग पकडला. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले. चंद्रपूरसह जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस सुरूच असून कमी-जास्त असे पावसाचे प्रमाण आहे. अमरावती जिल्ह्य़ातही मुसळधार पावसाचे थमान बुधवारी रात्रीपासून सुरू आहे. वर्धा येथे गुरुवार पहाटेपासून रिमझिम आणि दुपारपासून मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. अकोल्यातही अशीच परिस्थिती आहे. यवतमाळातही बुधवारपासून संततधार आहे. धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे.

Story img Loader