दोन दिवस उसंत घेतलेल्या परतीच्या पावसाने नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. नागपुरात सोमवारी पहाटेपासून तर इतरही रविवारपासूनच मुसळधार पावसाने ठाण मांडले. मोसमी पावसाने विदर्भात पूरस्थिती निर्माण केल्यानंतर परतीचा पाऊस देखील त्याच मार्गावर आहे. जोरदार पावसानंतरही वातावरणातील उकाडा मात्र कमी झाला नव्हता.
हेही वाचा : ‘डिजिटल इंडिया’त ३० टक्के ग्रामपंचायतींनाच ‘नेट’जोडणी; महाराष्ट्राचे प्रमाण ४४ टक्के
त्यानंतर आता विजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा एकदा प्रवेश केला आहे. नागपूरसह यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, वाशीम या जिल्ह्यात संततधार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तर वर्धा जिल्ह्यात देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. हा पाऊस असाच कायम राहिल्यास इतर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊन गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.