भंडारा : राज्यात मान्सून उशिरा दाखल होणार असला तरी मागील दोन दिवसांत भंडारा जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील मोहाडी व भंडारा तालुक्यातील अनेक भागांत रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शाळा, महाविद्यालय, घरांचे शेड उडाले. अनेक घरांची हानी झाली. शेतशिवार व रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडली. यामुळे मोहाडी शहरातील अनेक रस्ते बंद होते. वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर पिकांचेही मोठे नुकसान झाले.
हेही वाचा – आनंदवार्ता! सैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..
शनिवारी मोहाडी तालुक्याला गारपिटीसह वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी मोहाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वादळ, गारपिटीसह पावसाने थैमान घातले. वादळी पावसाने दहेगाव येथील वसंता खापेकर यांच्या घरावर चिंचेचे झाड कोसळले. यात घराचे मोठे नुकसान झाले तर त्याखाली दोन मोटारसायकल दबल्याने क्षतीग्रस्त झाल्या. मोहाडी तालुक्यात व परिसरात दोन दिवसांपासून वादळ, गारपिटीसह पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांसह लग्नसमारंभ असलेल्या कुटुंबाची मोठी दमछाक होत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दररोज पाऊस आणि हवामानबदल तत्परतेने सूचना देण्यात येत असून नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले जात आहे.