बुलढाणा: दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे दुकाने व घरात पाणी शिरले आणि खरीप पिकांची नासाडी झाली. शेगाव तालुक्यातील एक युवक पूर्णा नदीत बुडाला, तर विविध घटनांमध्ये वीज कोसळून चार जनावरे दगावलीत. यंदाच्या खरीप हंगामात बुलढाणा तालुक्यातील आजवरचा पाऊस असमाधानकारक असाच ठरला आहे. आज सोमवार, १९ ऑगस्ट अखेर बुलढाणा तालुक्यात एकूण सरासरीच्या तुलनेत ५९.८८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे.
बुलढाणा तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८६०.४ मिलीमीटर आहे. या तुलनेत आज १९ अखेर तालुक्यात ५१५.२ मिलीमीटर पावसाचीच नोंद झाली आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, मका ही पिके धोक्यात आली आहे. पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने हजारो शेतकरी चिंतातुर झाले होते. या पार्श्वभूमीवर अनेक दिवस दडी मारल्यावर बुलढाणा तालुक्यातील अनेक गावांत धोधो पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सैलानी, पिंपळगाव सराई, रायपूर, ढासाळवाडी, मातला, सिंदखेडराजा, वाडी या गावाच्या सलग पट्ट्यात आज १९ ऑगस्ट सलग एक तास जोरदार पाऊस पडला. काही गावात दीड तास पाऊस झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा – VIDEO : पाणी वाहात असलेल्या पुलावरून दुचाकी नेणे पडले महागात
पुलावर पाणी, वाहतूक विस्कळीत
या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात, घरात पावसाचे पाणी शिरले असल्याने गृहोपयोगी वस्तू, अन्न धान्याचे नुकसान झाले. तसेच त्यामुळे व्यवसायिकांचे देखील नुकसान झाले आहे. अनेक गावांत पावसाचे वाहणारे पाणी शेतात घुसल्याने शेती पिकांचे देखील नुकसान झाल्याचे वृत्त आहे .
सैलानीत भाविकांचे हाल
बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय भक्त मोठ्या संख्येत येत असतात. आज (राखी) पौर्णिमा असल्याने सैलानी दर्गावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. आज १९ ऑगस्टला सलग एक ते सव्वातास जोरदार पाऊस पडला. सैलानीत दाखल झालेल्या भाविकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दर्गाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. परिसरातील सर्व नाले पात्र सोडून वाहत असल्याने पाणी शेतात घुसले. त्यामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे कळते. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे.
खामगावमध्येही धुवांधार
दरम्यान खामगाव शहरातही आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास पाऊस झाला. यामुळे बस स्थानक व शहरातील सखल भागात पाणी साचले.
७ तालुक्यात अपुराच!
दरम्यान आज १९ ऑगस्ट अखेर जिल्ह्यातील १३ पैकी सात तालुक्यात झालेला पाऊस अपुराच असल्याचे दुर्देवी चित्र आहे. बुलढाणा (५९.८८ टक्के), चिखली (५९.५५ टक्के), सिंदखेडराजा (६३), लोणार (५४ टक्के), मेहकर (६०), या घाटावरील तालुक्यातील पावसाची टक्केवारी चिंताजनक अशीच आहे. घाटाखालील नांदुरा (६३ टक्के), मोताळा ( ६८ टक्के), संग्रामपूर ( ५८ टक्के) या तालुक्यातील पावसाची टक्केवारी असमाधानकारक म्हणावी अशीच आहे.
हेही वाचा – गडचिरोली : आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा….
पूर्णा नदीत युवक बुडाला
शेगाव तालुक्यातील एक युवक आज पूर्णा नदीत बुडाला. त्याच्या शोध घेण्यासाठी खामगाव येथील एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. उद्या बेपत्ता युवकाचा शोध घेतला जाणार आहे. निलेश गजानन चराटे (२७, रा. मनसगाव, ता. शेगाव) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. शेगाव येथून सुमारे १६ किलोमीटर अंतरावरील मनसगाव हे पूर्णा नदीच्या काठावर आहे. आज संध्याकाळपर्यंत या युवकाचा शोध लागला नसून उद्या मंगळवारी खामगाव येथील पथक त्याचा शोध घेण्यासाठी येणार आहे, अशी माहिती शेगावचे तहसीलदार दीपक बाजड यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.
वीज कोसळून चार जनावरे ठार
बुलढाणा जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही वज्राघाताचे थैमान कायम असल्याचे वृत्त आहे. आज तीन वेगवेगळ्या घटनांत, वीज अंगावर कोसळून चार पाळीव जनावरे दगावली. नांदुरा तालुक्यातील लासुरा खुर्द येथे आज संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास गजानन श्रीराम मालठाणे यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या (शेळ्या) जागीच ठार झाल्या. लोणार तालुक्यातील घटनेत वीज कोसळून उद्धव तेजराव मापारी यांच्या मालकीचा आणि सत्तर हजार रुपये किंमतीचा बैल दगावला. अन्य एका घटनेत चिंचखेड (ता. देऊळगाव राजा) येथे पावसादरम्यान वीज कोसळून सुरेश छगन जाधव यांची म्हैस ठार झाली.