चंद्रपूर : जिल्ह्यात व शहरात सर्वत्र कडक ऊन्ह असताना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आकाशात अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि सर्वदूर गारपिटीसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वरोरा या तालुक्याच्या ठिकाणी लिंबाच्या आकाराच्या गारांचा पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तसेच शेतीला फटका बसला. उन्हाचा पारा ४४ अंशापार गेला असताना असा अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात तसेच चंद्रपूर शहरात उन्हाळा चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे. शनिवारी ४३.८ व रविवारी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुन्हा उन्हाचा पारा ४३.६ अंश सेल्सिअस होता. मात्र, सोमवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर शहरात देखील रात्री उशिरा हलका पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून हळूहळू सूर्य डोक्यावर येऊन ऊन्ह तापायला लागले. दुपारी १ वाजता तर कडक ऊन्ह तापले होते. मात्र २ वाजतापासून अचानक ऋतू बदल झाला आणि आकाशात ढगांचा जोरात गडगडाट सुरू झाला. त्यानंतर अवघ्या काही वेळात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आकाशात सर्वत्र काळे ढग एकवटले होते व पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे वातावरण थंड झाले असले तरी उकाडा कायम आहे. आकाशात ढगांचा गडगडाट व पावसाच्या रिमझिम धारा सुरूच आहे. पावसामुळे कोरड्या पडलेल्या नाल्या तुडुंब भरून वाहत आहे. रस्त्यावर देखील पाणी साचलेले आहे.
हेही वाचा – वडेट्टीवार यांच्या पोस्टरला चपलांचा हार; यवतमाळात शिवसेनेचे निषेध आंदोलन
हेही वाचा – अकोला : सासूची हत्या करून अपघाताचा रचला बनाव; चारित्र्यावर संशय घेतल्याने जावयाने….
वरोरा तालुक्याच्या ठिकाणी लिंबाच्या आकारांच्या गारांसह मुसळधार पाऊस कोसळला. गारपिटमुळे शेतातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे ४४ अंश सेल्सीअसपर्यंत गेलेला तापमानाचा पारा आता खाली आला आहे.