चंद्रपूर : जिल्ह्यात बुधवारी दुपारच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. नागभीड, ब्रम्हपुरी, पोंभूर्णा, कोरपना व गोंडपिंपरी तालुक्यात वीज कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५), गोविंदा लिंगू टेकाम (५६), अर्चना मोहण मडावी (२७), पुरुषोत्तम अशोक परचाके (२५), कल्पना प्रकाश झोडे (४०), अंजना रूपचंद पुस्तोडे (५०), योगिता खोब्रागडे (३५) आणि रंजन बल्लावार यांचा समावेश आहे. ब्रम्हपुरी जवळील मौजा बेटाळा येथील गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५) या आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतावर काम करून घरी परत येत होत्या. वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा >>> हवाई दलाच्या विमानाने मानवी हृदय नागपूरहून पुण्याला….
गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनमजूर गोविंदा लिंगू टेकाम (५६) हे जंगलात वृक्षारोपणाचे काम करीत होते. याच दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यावेळी वीज कोसळली असता टेकाम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कोरपना तालुक्यातील चनई बु. येथे शेतात वीज कोसळून पुरुषोत्तम अशोक परचाके (२५) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे शेतात काम करताना वीज कोसळल्याने कल्पना प्रकाश झोडे (४०) व अंजना रूपचंद पुस्तोडे (५०) या दोन महिलांचा मृत्यू झाला तर सुनीता सुरेश आनंदे (३०) या जखमी झाल्या. तर गोंडपिपरी तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा येथील योगिता खोब्रागडे (३५) व नागभीड तालुक्यातील सोनापूर येथील रंजन बल्लावार यांचाही वीज पडून मृत्यू झाला
हेही वाचा >>> बुलढाणा: मटन मार्केटला आग, लाखोंचे नुकसान; मेहकरमध्ये खळबळ
पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा गावात शेतात काम करताना वीज कोसळल्याने अर्चना मोहन मडावी (२७) या महिलेचा मृत्यू झाला तर खुशाल विनोद ठाकरे (३०), रेखा अरविंद सोनटक्के (४५), सुनंदा नरेंद्र इंगोले (४६), राधिका राहुल भंडारे (२०), वर्षा बिजा सोयाम (४०), रेखा ढेकलु कुळमेथे (४५) हे जखमी झाले. जखमींमधील खुशाल ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. नागभीड तालुक्यातील नांदेड येथे रोवणीचे काम सुरू असताना वीज कोसळली. यात सोफिया शेख (१७), महेशा शेख (१६) या दोघी गंभीर जखमी झाल्या.