लोकसत्ता टीम
नागपूर : महाराष्ट्र व केरळच्या किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढग तयार झाल्यामुळे कोकण तसेच गोवा याठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाटाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात येत्या ४८ तास संततधार राहील.
मान्सूनने जवळजवळ ९९ टक्के देश व्यापला आहे. मागील आठवड्यापासून मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. अंदमान, निकोबार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, कच्छ, सौराष्ट्र, कोकण, गोवा तसेच राज्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होत आहे.
आणखी वाचा-चोवीस तासांत दोन हत्याकांडाने उपराजधानी हादरली
दरम्यान, हवामान खात्याने कोकण, गोव्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, पुणे व नाशिक येथील घाटांचा समावेश आहे. कोकण, गोवा या परिसरात तीन जुलै पर्यंत तर कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात पुढील ४८ तास रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे आज मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.