नागपूर : शहरात यापूर्वीही पूरस्थिती निर्माण झाली असली तरी ढगफुटीसदृश्य पाऊस पहिल्यांदाच नागपूरकरांनी अनुभवला. अवघ्या चार तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका मध्य नागपूरला बसला. पंचशील चौक परिसरात चार ते पाच फुट पाणी साचले. या परिसरात रुग्णालयांची संख्या अधिक असून अनेक रुग्णालयांमध्येदेखील पाणी शिरले. तसेच शंकरनगरातील वोकहार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिट पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे.
मध्यरात्री दोन वाजेपासून पहाटे पाचपर्यंत शहरात ढगांचा गडगडाट होता. तर मोठ्या प्रमाणात वीजा कडाडत होत्या. त्यामुळे नागरिक अक्षरश: जीव मुठीत घेऊन बसले होते. या तीन ते चार तासांत कोसळलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पंचशील चौक, सीताबर्डी व आजूबाजूच्या परिसराला बसला. पंचशील चौकात अनेक रुग्णालये असून या रुग्णालयांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. चार ते पाच फूट पाण्यामुळे परिसरातील चारचाकी वाहनेही पाण्यात होती. तर यात काही रुग्णवाहिकादेखील पाण्याखाली आल्या.
हेही वाचा – नागपूर अतिवृष्टी : बचाव पथकाची ७ गटांत विभागणी, १४० लोकांना सुखरूप हलवले
शहरातील मोरभवन हे शहर बसस्थानकही पूर्णपणे पाण्याखाली आले. बसेस अर्ध्याहून अधिक पाण्याखाली आल्या. सीताबर्डी मेट्रो स्थानकालाही पावसाचा फटका बसला. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अविरत मुसळधार पावसाने शुक्रवारी रात्री संपूर्ण नागपूरला झोडपून काढले आणि अनेक परिसर पुराच्या पाण्यात बुडाले. रात्रभर पडलेल्या पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झाले असून त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे.
हेही वाचा – नागपूर : पुरात अडकलेल्या माय-लेकीला वाचवण्यासाठी ‘तिने’ लावली जिवाची बाजी
शंकरनगर येथील सरस्वती विद्यालय पाण्याखाली गेले तर वोकहार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिट पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. नागपूर रेल्वेवरील रेल्वे रुळ प्लॅटफार्मपर्यंत पूर्णपणे भरून गेल्याने अनेक गाड्यांना उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शंकरनगर, अंबाझरी आणि कॉर्पोरेशन कॉलनीजवळील परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.