नागपूर : उकाड्याने त्रस्त झालेल्या नागपूरकरांना रविवारी बरसलेल्या पावसाने दिलासा दिला. पावसामुळे महालमध्ये नागनाल्यालगतची भिंत कोसळली. ग्रामीण भागातही पावसाला जोर असून गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी त्याचे स्वरुप सार्वत्रिक नव्हते. काही भागात पाऊस तर काही भाग कोरडा असेच चित्र होते. शहरात उकाड्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. रविवारी दुपारनंतर शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडला.
रस्त्याच्या खोलगट भागात पाणी साचले. वातावरणातही गारवा तयार झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दुपारच्या पावसामुळे बर्डीच्या बाजारपेठेत विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली. वर्धामार्गावरील मेट्रोच्या पुलाखाली अनेक जण पावसापासून बचाव करण्यासाठी थांबलेले होते. मेडिकल चौकातही पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली.महालमधील तुळसीबाग परिसरात नागनाल्याला लागून असलेली स्वामी समर्थ सेवा केंद्राची संरक्षक भिंत कोसळली.
हेही वाचा : ‘तो’ बायकोसोबत बोलला म्हणून नवरोबा संतापले, मित्रांच्या मदतीने…
गोसीखुर्दचे दरवाजे उघडले
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तसेच धापेवाडा बॅरेजमधून पाणी सोडण्यात आल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे पाच दरवाजे ०.५ मीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करम्यात आले आहे.
विदर्भात इतर जिल्ह्यातही पाऊस
विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातही पावसाची नोंद करण्यात आली. वाशीम जिल्ह्यात नद्यांना पूर आला. काही ठिकाणी यामुळे वाहतूक विस्कळित जाली होती.
हेही वाचा : धक्कादायक! ‘समृद्धी’वर आता गोवंश तस्करी…
शेतकरी सुखावले
अनेक दिवसाच्याप्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले आहे. पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र या पावसाने सध्या तरी हा धोका टळला आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या उकाड्यामुळे नागरिक वैतागले होते त्यांनाही पावसाची प्रतीक्षा होतीच. पावसाळ्याचा एक महिना उलटल्यावरही काही भागाचा अपवाद वगळता अन्यत्र पावसाचे प्रमाण कमीच होते. छोट्या आणि मोठ्या धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नव्हती. अशीच स्थिती राहिल्यास पुढच्या काळात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती.
नागपुरात अर्धवट रस्त्यांमुळे गैरसोय
नागपूरमध्ये विविध भागात सिमेट रस्त्यांची कामे सुरू आहेत. तेथे आता पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही भागात रस्ते बांधकामामुले कच्च्या रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. तेथे चिखल साचला आहे. अभ्यंकरनगर ते गांधीनगर हा रस्ता निम्मा खराब झाला आहे. पावसामुळे तेथे चिखल साचला आहे.