नागपूर: गेले आठवडाभरापासून मुसळधार पावसाने राज्यासह देशभरात हजेरी लावली. आता आणखी पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुर्व विदर्भाच्या काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुण्यात आज पावसाचा “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई आणि ठाण्यातही “येलो अलर्ट” असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा… बुलढाणा : अतिवृष्टीचा संग्रामपूर, जळगावला तडाखा! हजारो हेक्टर जमीन खरडली; दोनशे जनावरे दगावली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे.