यवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २४ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली.जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मसळधार पाऊस कोसळला. रविवारीही पावसाची संततधार सुरूच होती. पावसाने आज सोमवारी सकाळी काही काळ उघडीप दिली मात्र दुपारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांत कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील २४ मंडळांना झोडपून काढले. यात बाभूळगाव तालुक्यातील बाभूळगाव मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याच तालुक्यातील वेणी मंडळात ६९ मिमी पाऊस पडला.
कळंब तालुक्यातील कळंब मंडळात ६५ मिमी, मेटीखेडा मंडळात ७0 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. वणी तालुक्यातील मंडळांमध्ये सर्वाधिक ८१ मिमी पाऊस वणी मंडळात तर राजूर मंडळात ६८ मिमी, भालर मंडळात ८० मिमी, पुनवट मंडळात ८५ मिमी, शिंदोला मंडळात ७४ मिमी, कायर मंडळात ९६ मिमी, रासा मंडळात ९३ मिमी, तर शिरपूर मंडळात ८५ मिमी पावसाची नोंद झाली. मारेगाव तालुक्यातील मारेगाव व मार्डी मंडळात प्रत्येकी ७९ मिमी, कुंभा मंडळात ८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. झरी तालुक्यातील झरी, खडकडोह, माथर्जुन आणि शिबला मंडळात प्रत्येकी ८६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राळेगाव तालुक्यातील राळेगाव मंडळात ६५ मिमी, झाडगाव मंडळात ८४ मिमी, धानोरा व वाढोणा मंडळात प्रत्येकी ८४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. राळेगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे सात घरांची पडझड झाल्याचा अहवाल महसूल विभागाने शासनाकडे पाठविला आहे. जिल्ह्यात १७ घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पावसाचे पाणी शेतात शिरल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम व ६२ लघु प्रकल्पांतील जलपातळीत संततधार पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. सायखेडा व गोखी हे दोन मध्यम प्रकल्प या पावसाने ओव्हरफ्लो झाले आहेत.
हेही वाचा >>>महसूल कर्मचाऱ्यांच्या ‘कामबंद’ची कोंडी फुटणार? महसूल मंत्र्यांची उद्या…
शनिवारी व रविवारी झालेल्या पावसाने जिल्यायातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते. वणी, मारेगाव तालुक्यातील अनेक मार्गांवरील नाल्यांना पूर असल्याने वाहतूक काही काळ थांबली होती. मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे वर्धा नदीला पूर आल्याने या मार्गांवरील चंद्रपूर जिल्ह्यात होणारी वाहतूक थांबली होती. दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे अडाण नदी थोडाही पाऊस आल्यानंतर दुथडी भरून वाहते. त्यामुळे येथील बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे.