Heavy Rain Warning In Maharashtra : वेळेआधीच दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या उत्तरार्धात राज्यातून दडी मारली होती, पण आता पुन्हा हा पाऊस परतला आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज, गुरुवारी राज्यातील काही भागात आणि विशेषकरुन विदर्भ आणि कोकणात मूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मोसमी पावसासाठी पुरक असा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे आहे, त्यामुळे राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. प्रामुख्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने उसंत घेतली होती. तर विदर्भात देखील तुरळक सरी वगळता फारसा पाऊस झाला नाही. केवळ रविवारी उपराधानीत मुसळधार पाऊस झाला. मात्र, आज गुरुवारी हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खूश खबर, लवकरच…

कोकण आणि विदर्भात मुसळधार तर उत्तर व मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भासह कोकण आणि घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बुधवारी विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर आणि कोकणात सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विदर्भात मूसळधार पावसाचे वातावरण असले तरी पावसाच्या हलक्या सरी वगळता फारसा पाऊस पडलाच नाही.

हेही वाचा – कुलगुरू डॉ. चौधरींचे अखेर दुसऱ्यांदा निलंबन, राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासून घेतला निर्णय

राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे राज्य व्यापलेला मोसमी पाऊस कधी सक्रीय होणार आणि राज्यात दमदार पाऊस कधी दाखल होणार याचीच प्रतिक्षा होती. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाने ही प्रतिक्षा संपल्यात जमा आहे. मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला असून ‘येलो अलर्ट’ दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

राज्याच्या उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान काही ठिकाणी मोसमी पावसाची आस असणारा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर काही ठिकाणी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.