अमरावती : पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली असून पहिल्या शिडकाव्याने चिखलदरा येथे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चोवीस तासांत चिखलदरा येथे ३६.२ मिमी पावसाची नोंद झाली.गेले काही महिने उन्हाची काहिली सहन केल्यानंतर आता झालेले पावसाचे आगमन हे अतिशय सुखावह आहे. सातपुडा पर्वतरांगेत तब्बल एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. खोल दऱ्या, धबधबे, दूरवर पसरलेले हिरवे गालिचे, धुक्याची दुलई असे चित्र इथे पावसाळ्यात पाहायला मिळते.
भटकंतीसाठी देवी पॉईट, पंचबोल पॉईट. वॉटर बोटींग व दुचाकीवरून मस्त फिरण्यासाठी भीम कुंड, वन उद्यान, ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. अजून धबधबे सुरू व्हायचे असले, तरी गेल्या दोन ते तीन दिवसातील पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आहे. धुक्याची चादर पसरली आहे.अमरावती जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ६.७ मिमी पावसाची नोंद झाली, सर्वाधिक ३६.२ मिमी पाऊस चिखलदरा तालुक्यात झाला. अमरावतीत ४.१ मिमी, तर वरूडमध्ये १०.२ मिमी पाऊस झाला. १ जून ते २७ जूनपर्यंत जिल्ह्यात ५३.४ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ८८.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.