लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मंगळवारी सकाळापासून सुरू असलेला पाऊस आज बुधवारीही कायम आहे. मंगळवारी अनेक भागात मुसळधार तर अनेक ठिकाणी संततधार पाऊस झाला. जिल्ह्यात २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. केळापूर तालुक्यात खुनी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मांडवी ते पाटणबोरी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. मंगळवारी कळंब तालुक्यात घराची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४३.६ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ७४.८ मिमी पाऊस मारेगाव तालुक्यात कोसळला. त्याखालोखाल वणी (७२.७मिमी), केळापूर तालुक्यात ७१.६ मिमी पाऊस कोसळला. सर्वात कमी ५.१ मिमी पावसाची नोंद पुसद तालुक्यात करण्यात आली. पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे सहा दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले असून, त्यातून २५८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारव्हा तालुक्यातील गोकी प्रकल्पातून १६ सेंमीने २६.११ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घाटंजी तालुक्यातील वाघाडी प्रकल्पातून ७१.६८ घमीप्रसे, तर केळापूर तालुक्यातील सायखेडा धरणातून ११०.४४ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

आणखी वाचा-भयंकर! आधी गळा दाबला, मग पोत्यात कोंबले आणि उकीरड्यात पुरले! आते भावानेच…

कळंब तालुक्यातील आष्टी येथील सीताबाई वामनराव कलंबे (८७) या वृद्धेचा मंगळवारी दुपारी घराची भिंत अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला. दुर्घटना घडली तेव्हा घरात ती एकटीच होती. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ४९५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन हजारांपेक्षा अधिक हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे.

नागपूर – हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा

पांढरकवडा शहरातून जाणाऱ्या नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाची पावसाने प्रचंड दुर्दशा झाली आहे. या महामार्गावर राळेगाव तालुक्यातील वडकी ते पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी दरम्यान ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहने नादुरुस्त होण्यासोबतच अपघातांची शक्यता वाढली आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची चाळणी झाली असल्याने खड्ड्यांत उसळून अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. ही नादुरुस्त वाहने रस्त्याच्या कडेला, किंवा मध्येच उभी करून ठेवण्यात येत असल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यताही वाढली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)चे या दुरवस्थेकडे लक्ष नसल्याचा आरोप वाहनचालक करत आहे. केळापूरलगत टोलवर वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली सुरू असताना महामार्गाची दुरूस्ती होत नसल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.