भंडारा : दीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात दमदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी-नाले दुथडी भरून तर ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वैनगंगेच्या कारधा नदीपात्रातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोण खेळतयं? अर्थमंत्र्यांच्या बैठकीनंतर आधार योजना, वसतिगृह अधांतरी

धोक्याची पातळी २४५.५० मीटर असताना काल पाणी पातळी २४४.१९ पर्यंत पोहचली होती. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने  ताबडतोब पाण्याच्या विसर्ग सुरू केला असून पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या ही पाणी पातळी २४४.०६ मी. असून धोक्याच्या पातळीपेक्षा साधारणतः १ मीटरने खाली आहे. पुढील काही तास संतत धार पाऊस झाल्यास शहरातील खोल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेहमी ज्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या गोसेखुर्द धरणाचे ३३  दरवाजे उघडण्यात आले असून १२ दरवाजे ०.५ मिटरने तर २१ दरवाजे १ मिटरने उघडण्यात आले आहेत. यातून ५९६२.९५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा >>> “ होय मेट्रोची कनेक्टिव्हीटी वाढवण्यात आम्ही कमी पडलो, पण … ” काय म्हणाले मेट्रोचे एम.डी.

नदी काठावरील नागरिकांनी नदीपात्रातून आवागमन करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नसल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नदी व नाल्यांना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे नदीचे पाणी, धरणातील विसर्ग व तलावाचे पाणी बघायला जाण्याचे टाळावे. सदर ठिकाणी सेल्फी घेण्याचा मोह करू नये. आपल्या जीवितास त्याच बरोबर सोबतच्या लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.