बुलढाणा : दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या दमदार पावसाने लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला खरा, पण यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंची अतिवृष्टीदेखील झाली! जिल्ह्यात प्रामुख्याने घाटाखालील तालुक्यात झालेल्या पावसाच्या तांडवाचा तब्बल दोनशेहून अधिक गावांना जबर तडाखा बसला.
१८ व १९ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची नासाडी झाली. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत २१६ गावांतील ७५ हजार ५१४ हेक्टरवरील खरीप पिकांची नासाडी झाली. यामध्ये कापूस, सोयाबिन, मका, उडीद, तूर, मुंग या खरीप पिकांचा समावेश आहे. काही तासांतच ९२ मिमी इतक्या धोधो पावसाची नोंद झालेल्या शेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.
हेही वाचा – ‘आयजी’चे बदली आदेश हवेतच; २८ दिवसानंतरही एलसीबीचे ‘पीआय’ कार्यमुक्त नाही
हेही वाचा – त्या इमर्जन्सी अलर्ट मेसेजला घाबरू नका, बघा आणि दुर्लक्ष करा, जिओकडून ग्राहकांना सूचना
तालुक्यातील ७७ गावांतील ३९ हजार ७२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मलकापूर तालुक्यातील ७८ गावांतील १७ हजार ५३७ तर नांदुरा तालुक्यातील ६१ गावांतील १८ हजार २५० हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांनी सांगितले. याशिवाय मलकापूर तालुक्यातील ४ हेक्टर शेतजमीन वाहून वा खरडून गेल्याचे आढळून आले.