नागपूर : जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने जुलैमध्ये मात्र थैमान घातले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका वर्धा जिल्ह्याला बसला असून ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीत गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, वैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात रनाळा गावातील दहा वर्षीय दीपेश ब्राह्मणकर हा विद्यार्थी सोमवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर यवतमाळ जिल्ह्यात जय गायकवाड या १२ वर्षीय मुलाचा वडगाव रोड परिसरात मुलकी भागात असलेल्या नालीत बुडून मृत्यू झाला.
चोवीस तासांच्या विश्रांतीनंतर विदर्भात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वर्धा, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. वर्धा जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक गावे पाण्याने वेढली आहेत. समुद्रपूर तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. सेलूतील बाभूळगाव पुलावरून, आर्वीत वर्धमनेरी पुलावरून पाणी वाहत असून पेथरा नदीला पूर आल्याने सात गावांचा संपर्क तुटला. बोर नदी, भदाडी नदीला पूर आहे. गडचिरोली जिल्ह्यातही पर्लकोटी नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड, हेमलकसा येथे पूरस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांसह नाले दुथडी भरून वाहत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातही राळेगाव तालुक्यात वर्धा नदीचे पाणी अनेक गावांत शिरले. तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, रामगंगा नदीला पूर आहे. चाण, बोरगाव, नारकुंड गावात पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कळंब तालुक्यातील पहूर-पिलखाना मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा येथील खुनी नदीला पूर आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती, चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी आहे. घाटलाडकी येथील चारगड धरण ओसंडून वाहत असल्याने राज्य महामार्गावरील चारगड नदीवरील पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला. परतवाडा ते घाटलाडकी मार्गे मोर्शी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. येथील सिपना नदीला आठवडय़ात तिसऱ्यांदा पूर आला. गोंदिया, चंद्रपूर, नागपूर येथेही पावसाने ठाण मांडले आहे.
धरणांमधून विसर्ग सुरू
वर्धा जिल्ह्यात निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पाचे नऊ दरवाजे, यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा प्रकल्पाचे सहा दरवाजे, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे, अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा धरणाचे सर्व १३ दरवाजे, पूर्णा प्रकल्पाचे नऊ दरवाजे, चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत.