वर्धा : जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने थैमान माजविले असून अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. हिंगणघाट तालुक्यात कुंभी येथे २५ घरात नाल्याचे पाणी शिरल्याने प्रशासनाने घरातील सर्वांना लगतच्या शाळेत स्थलांतरित केले. देवळी तालुक्यात सरुळ येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी वर्धा राळेगाव मार्ग बंद पडला. दरम्यान आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवारी सायंकाळी गीरड येथे शेतात वीज पडल्याने दुर्गा ज्ञानेश्वर जंभुळे ही महिला ठार झाली. तसेच याच शेतात काम करणाऱ्या पाच महिला जखमी झाल्यात. त्यांना समुद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. देवळी तालुक्यातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरूनदेखील पाणी वाहत आहे. तसेच गंगापूर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यापैकी गंगापूर गावाचा संपर्क तुटला आहे व इतर गावांना पर्यायी मार्ग आहे. समुद्रपूर तालुक्यातील वासी जवळील पुलावर पाणी असल्याने नंदोरी वासी रस्ता सद्या बंद आहे.
सेलू तालुक्यातील सिंदी-पिंपरा-हेलोडी रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने पिंपरा व हेलोडी येथे वाहतुकीसाठी असलेला पर्यायी रस्ता बंद झालेला आहे. देवळी तालुक्यातील खडका येथे बोर नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. सिंदी रेल्वे ते दिग्रज रस्ता, सिंदी रेल्वे ते पळसगाव बाई रस्ता, पहेलानपूर ते दहेगाव स्टे रस्ता, आलगाव ते शिवनगाव रस्ता तसेच परसोडी ते भानसोली रस्ता नाल्याच्यावरून पाणी वाहत असल्याने तात्पुरता बंद झालेला आहे.
हेही वाचा – नागपूरची नागनदी भरली, वस्तीमध्ये पाणी, शहर जलमय
सेलू तालुक्यातील खडका येथे बोर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट ते येणोरा, कुंभी ते सातेफळ रस्ता बंद झाला आहे. तसेच पोहणा ते वेणी नाल्याला पूर असल्याने मार्ग बंद झाला आहे. सेलू तालुक्यातील जयपूर ते चारमंडळ रस्त्यावरील बोर नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावांंचा संपर्क तुटलेला आहे..