यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाल्याने या प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली. सोमवारी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ शहरात सोमवारी रात्रभर पाऊस कोसळत होता. आज मंगळवारी सकाळपासून मुसळधार सरी कोसळत आहे.
बाभूळगाव तालुक्यातील खडकसावंगाजवळील बेंबळा धरणाच्या मागील बाजूस दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणाची पाणी पातळी वाढलेली आहे. निर्धारीत केलेल्या क्षमतेपेक्षा पाण्याची पातळी आणखी वाढू नये याची दक्षता म्हणून बेंबळा जलसिंचन प्रकल्प विभागाने सोमवारी सायंकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडले. यापूर्वीही धरणाचे दोन उघडण्यात आल्याने आता एकूण चार दरवाजे ५० सेंमीने उघडून प्रतिसेकंद १७२ घ.मी. पाण्याचा विसर्ग बेंबळा नदीपात्रात सुरू आहे. धरणात येणाऱ्या विसर्गावरून दरवाजांची संख्या कमी जास्त केली जाणार आहे.
हेही वाचा…चंद्रपुरकरांची दहा वर्षांत ५५० कोटींनी फसवणूक; चिटफंड कंपन्यांनी…
बेंबळा नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आता जोर पकडला असून संपूर्ण जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी धुवांधार पाऊस बरसला आहे. नेर तालुक्यातील शिरसगाव मंडळात अतिवृष्टी झाली असून येथे ९८.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. येथील स्थिती गंभीर आहे. पावसामुळे ग्रामीण भागात अनेक घरात पाणी शिरले. शहरातही नगर परिषदेने नालेसफाई न केल्याने अनेक भागात नालीतील पाणी रस्याहरवर आले. अनेक ठिकाणी शेती खरडून गेली आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. वणी आणि मारेगाव तालुक्यात पावसाचा रेड अलर्ट सांगितला असून तेथे स्थानिक यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा…बावनकुळे म्हणाले “मुले कोणाची…बारसे कोण करतय…”
धरणांमध्ये जलसाठा वाढला
जिल्ह्यात मध्यम व मोठे असे दहा प्रकल्प आहे. त्यामध्ये सध्या ४६.६ टक्के पाणीपातळी आहे. सर्वाधिक ८५.९८ टक्के जलसाठा हा सायखेडा (केळापूर) प्रकल्पात आहे. गोखी (दारव्हा) ८२.८४ टक्के, वाघाडी (घाटंजी) ६१.४३ टक्के लोअरपूस (महागाव) ८१.२३ टक्के, अडाण (कारजा) ५५.७0 टक्के, नवरगाव (मारेगाव) ३८.५४ टक्के, बोरगाव (यवतमाळ) ३९.३ टक्के इतका जलसाठा आहे. मोठे प्रकल्पांपैकी पूस (पुसद) ५५.५८ टक्के, अरुणावती (दिग्रस) ५८.५८ टक्के तर बेंबळा (बाभूळगाव) ४८.९१ टक्के इतका जलसाठा आहे. यवतमाळला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण गेल्याच आठवड्यात ओव्हरलो झाले आहे.