यवतमाळ: जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अजूनही अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील पावसाचा व पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिल्याने नदीकाठच्या व सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.