नागपूर: रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवरून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या पुरेशा ठरत नाही. अपघात प्रवण स्थळे निश्चित केल्यावरही त्यावर उपाययोजना करण्यास विलंब होतो. अपघात झाल्यावर तत्काळ प्राथिमक उपचार मिळत नाही आणि अपघातग्रस्तांना प्राण गमवावे लागतात, असे सार्वत्रिक चित्र आहे. सर्वच काही सरकार करेल या धारणेवर अवलंबून न राहता लोकसहभागातून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न नागपुरात ‘रोडमार्क फाउंडेशन’ आणि ‘आयरास्ते’ या स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जात आहे.
शहरातील अपघात प्रवणस्थळी अपघात झाल्यास तातडीने किमान प्राथमिक उपचार मिळावे म्हणून रस्त्यालगत राहणारे नागरिक, व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि आटोचालक यांचा एक गट तयार करून त्यांच्या मदतीने सेवा देण्याचा प्रयत्न या संस्थांचा आहे. त्यांच्यामार्फत अपघात प्रवणस्थळी ‘रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र’ सुरू केले जात आहे. अशाच एका केंद्राचे (वर्धा मार्गावरील छत्रपती चौक) उद्घाटन सह. पोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांच्या हस्ते झाले. चौकातील औषध दुकानाच्या परिसरात आपत्ती व्यवस्थापन पेटी लावण्यात आली. त्याच्या चाव्या संस्थेने नियुक्त केलेल्या ‘देवदूतांन” (अपघातग्रस्तांना मदत करणारे ) यांना दोरजे यांच्या हस्ते देण्यात आल्या.
हेही वाचा >>> गोंदिया : बिबट शिकारप्रकरणी चार आरोपींना अटक
यावेळी धंतोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. एरकुरे ,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव इंगळे,आशीष नाईक,प्रशांत हरगुडे रोडमार्क फाउंडेशनचे अध्यक्ष राजु वाघ,आय रास्ते चे प्रतिनिधी मनोज मुरकुटे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी श्यामकुळे, राम धवड, अविनाश तेलरांधे आणि स्थानिक नागरिक व व्यावसायिक उपस्थित होते. लोकसहभागातून अपघातमुक्तीचे प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे राजू वाघ यांचे दौरजे यांनी कौतूक केले. छत्रपती चौकातीतल ऑटोचालक संघटनेचे अध्यक्ष मदन काळे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. २० वर्षाच्या काळात प्रथमच अशा पद्धतीचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुणीतरी उभी केल्याचे ते म्हणाले