नागपूर : शहरात दंगलीनंतर तणावपूर्ण शांतता असतानाच अचानक पोलीस नियंक्षण कक्षातील फोन खणखणला आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. या निनावी फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या फोननंतर बॉम्बची शोधाशोध करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची धावपळ उडाली. बॉम्बशोधक-नाशक पथक तातडीने उच्च न्यायालयात पोहचले. पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला. उच्च न्यायालयात अचानक घडत असलेल्या घडामोडी आणि पोलिसांच्या बंदोबस्तामुळे वकिलांमध्येही कुजबुज सुरु झाली.
सखोल शोधमोहीमेनंतर काहीच न सापडल्याने तो फोन अफवाच असल्याचे स्पष्ट झाले व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीला सदर पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ओमप्रकाश वासनानी असे फोन करणाऱ्या आरोपी युवकाचे नाव आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन दुपारी साडेचार सुमारस नागपूर पोलिसांना आला. त्यानंतर तातडीने तेथे बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच इतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली. इमारतीत शोध मोहीम सुरू करण्यात आली. इमारतीचा कानाकोपरा तपासल्यावर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित फोन नेमका कुणी केला? याचा पोलिसांनी शोध केला.
या प्रकरणाचा तपास करण्यात आला. पोलिसांनी जरीपटक्यातून फोन आल्याची माहिती समोर आली. गुन्हे शाखेने जरीपटक्यातील ओमप्रकाश वासनानी याला ताब्यात घेतले. त्याला सदर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने उच्च न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्याची कबुली दिली. ओमप्रकाशविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासाठी दिली धमकी
ओमप्रकाश याच्या अमरावतीमध्ये विवाहित बहिणीचा सिलींडरच्या स्फोटात मृत्यू झाला होता. या प्रकरणात राजापेठ पोलीस ठाण्यात बहिणीच्या पती व सासऱ्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. २००७ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर ओमप्रकाश न्यायालयीन लढाई लढत होता. मात्र, २०११-२०१२ मध्ये उच्च न्यालयातून बहिणीचा पती व सासरा निर्दोष सुटला. तेव्हापासून ओमप्रकाश याने दोन्ही आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. तो नेहमी उच्च न्यायालयात जाऊन हा खटला नव्याने सुरु करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. ओमप्रकाश हा स्वत:हून जरीपटका पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने बॉम्बस्फोटाचा कॉल केल्याची कबुली पोलिसांना दिली.