नागपूर : मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे. विवाहित मुलीला अनुकंपा आधारित नोकरी नाकारणे असंवैधानिक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) मध्ये काम करणाऱ्या राजू उसरे यांचा २०२० साली मृत्यू झाला. त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुली आहेत. आई आणि मोठय़ा बहिणीकडून सहमती घेऊन लहान मुलगी खुशबू चौतेल यांनी अनुकंपा आधारावर नोकरीसाठी अर्ज केला. परंतु, ऑगस्ट २०२१ मध्ये वेकोलिद्वारा अर्ज नाकारण्यात आला. नॅशनल कोल वेज अॅग्रिमेंटमध्ये विवाहित मुलीला अनुकंपा आधारावर नोकरी देण्याची तरतूद नसल्याचे कारण वेकोलितर्फे देण्यात आले.
अर्ज नाकारल्यावर खुशबू यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. अॅड. अनिल ढवस यांनी खुशबूच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. अॅड. ढवस यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयातील आशा पांडे विरुद्ध कोल इंडिया प्रकरणाचा दाखला देत विवाहित मुलीला नोकरी नाकारणे असंवैधानिक असल्याचे सांगितले.न्यायालयाने खुशबू यांना दिलासा देत वेकोलिला एक महिन्यात यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले. न्यायाधीश अविनाश घरोटे आणि न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. वेकोलिच्यावतीने अॅड. पुष्कर घारे यांनी बाजू मांडली.