नागपूर : फेब्रुवारी महिन्यात नागपूरमध्ये पुण्यातील पोर्शे कारसारखा भीषण अपघात करणारी नागपूरची ३९ वर्षीय आरोपी रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नामंजूर केला. यामुळे आता आरोपी महिलेला अटक होणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर रितिकाने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला. तिच्या जामीन अर्जावर बुधवारी उच्च न्यायालयाने निर्णय दिला.
२५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर हा अपघात झाला होता. रितिका मद्यधुंद अवस्थेत वेगात मर्सिडिज कार चालवत होती. दरम्यान, तिची कार अनियंत्रित होऊन आधी रामझुल्याच्या कठड्याला धडकली व त्यानंतर कारने मोहम्मद हुसैन गुलाममुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) हे दोन तरुण मित्र स्वार असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही तरुण दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना जवळच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मोहम्मद हुसैनला तपासून मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही तरुण बैंक फायनान्सचे काम करीत होते. त्यांना या क्षेत्रात खूप पुढे जायचे होते. परंतु, रितिकाच्या नशेने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. तहसील पोलिसांनी रितिकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), (निष्काळजीपणाने २७९ वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला.
हेही वाचा…सावधान ! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
रितिकाने सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून अटकपूर्व जामीन मागितला होता. मात्र तो २४ मे रोजी फेटाळण्यात आला. परिणामी, तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने आरोपी रितिकाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी तब्बल तीन महिन्याचा कालावधी लावला होता. पुण्याच्या पोर्शे घटनेनंतर रामझुला प्रकरणात न्यायासाठी समाज माध्यमांवर रोष बघायला मिळाला होता.