नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाची दारे २०२४ सालातील ३६५ दिवसांपैकी १३२ दिवस बंद राहणार आहेत. टक्केवारीनुसार बघितले तर वर्षातील ३६ टक्के दिवस उच्च न्यायालयात कामकाज होणार नाही. ब्रिटिशकालीन परंपरेचे पालन करत यंदाही उच्च न्यायालय प्रशासनाने सुट्टया जाहीर केल्या आहेत. अलिकडेच न्यायालयीन प्रशासनाने २०२४ सालच्या सुट्ट्यांची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील सर्व खंडपीठात ही दिनदर्शिका लागू राहणार आहे. यानुसार, उच्च न्यायालयाला ग्रीष्मकालीन ३० दिवस सुट्टी तर दिवाळीनिमित्त १६ दिवस न्यायालय बंद राहणार आहे. नाताळनिमित्त देखील उच्च न्यायालयात १० दिवसाचा अवकाश राहील. उच्च न्यायालयात १३ मे ते ९ जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहतील. दिवाळीच्या सुट्ट्या २८ ऑक्टोबर पासून ८ नोव्हेंबर पर्यंत राहतील. महिन्यानुसार बघितले तर उच्च न्यायालय सर्वाधिक २३ दिवस मे महिन्यात बंद राहील. जून, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात प्रत्येकी १४ दिवस न्यायालयीन कामकाज होणार नाही. सणानिमित्त १८ दिवस न्यायालयाची दारे बंद राहतील. याशिवाय ५२ रविवार तसेच प्रत्येक दुसरा आणि चौथा शनिवार असे २६ शनिवार देखील न्यायालय बंद राहील. खंडपीठानुसारही काही विशेष दिवशी न्यायालयाला सुट्टी देण्यात आली आहे.
हेही वाचा… धक्कादायक ! कापसाची बोंडे खाल्ल्याने नव्वद मेंढ्या दगावल्या
हेही वाचा… अमरावती जिल्ह्यातील १ हजार ९१४ स्वस्त धान्य दुकानांना टाळे; स्वस्त धान्याचे वितरण ठप्प
नागपूर खंडपीठात १० मे रोजी अक्षय तृतीया आणि ११ सप्टेंबर रोजी ‘महालक्ष्मी पूजा’निमित्त सुट्टी राहील. पणजी खंडपीठात ६ सप्टेंबरला हरतालिका, ३ डिसेंबरला ‘फीस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेव्हिअर’ तसेच १९ डिसेंबरला ‘गोवा मुक्ती दिना’निमित्त सुट्टी घोषित करण्यात आली आहे.