लोकसत्ता टीम
बुलढाणा: जळगाव जामोद परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका महावितरणलाही बसला. यामुळे ४८ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी ही माहिती दिली. त्यानुसार बाळापूर- जळगाव जामोद या १३२ केव्ही अतीउच्चदाब वाहिनीचा लोकशन नं १४७ मनोरा पावसामुळे जमिनदोस्त झाला. यामुळे १३२ केव्ही जळगाव जामोद या अती उच्चदाब उपकेंद्रासह महावितरणच्या ३३/११ केव्हीच्या ४ उपकेंद्राचा वीज पुरवठा बाधित झाला आहे.
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहितीही सुरेंद्र कटके यांनी दिली .१३२ केव्ही अतीउच्चदाब बाळापूर उपकेंद्रातून १३२ केव्ही जळगाव जामोद या अतीउच्चदाब उपकेंद्राला वीज पुरवठा करण्यात येतो. त्यांनतर १३२ केव्ही जळगाव जामोद या उपकेंद्रावरून महावितरणच्या ३३ केव्ही उमापूर, ३३ केव्ही जळगाव जामोद, ३३ केव्ही जळगाव आयपीडीएस आणि ३३ केव्ही जामोद उपकेंद्राला वीज पुरवठा होतो.मात्र बाळापूर- जळगाव जामोद या महापारेषणच्या अतीउच्चदाब वाहिनीवरील १४७ क्रमांकाचा मनोरा पावसामुळे जमिनदोस्त झाल्याने १३२ केव्ही जळगाव जामोदसहीत महावितरणच्या ४ उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
आणखी वाचा-अप्पर वर्धा धरण तुडूंब, पण शहानूर अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत… कारण काय, जाणून घ्या
यामुळे १२ हजार ७७० ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने जळगाव आणि संग्रामपूर परिसरात महावितरणचे किमान ७ रोहित्राचे स्ट्रक्चर हे पुरात वाहून गेले आहे. अनेक रोहित्राचे संपूर्ण स्ट्रक्चर जमिनीला भिडले आहे. त्यासोबतच ३३ केव्ही वीज वाहिन्यांचे अनेक पोल वाहून गेले असुन बरेच पोल खाली पडले आहे. त्यामुळे वीज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महावितरणचे दुरूस्ती कार्य सुरू आहे.याशिवाय इतर नजिकच्या उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरू करता येते का याचीही चाचपणी सुरू आहे. संपूर्ण परिसरच जलमग्न झाले असल्याने शोध कार्याला आणि दुरूस्ती कार्याला अडथळा निर्माण होत आहे.