नागपूर : विदेशातून आलेल्या नागरिकांकडून घडलेल्या गुन्ह्यामुळे त्यांना कारागृहात डांबण्यात येते. राज्यभरातील कारागृहात ६५५ विदेशी नागरिक कैदी म्हणून शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी सर्वाधिक कैदी मुंबई कारागृहात असून मुंबई जिल्हा कारागृहात सर्वाधिक विदेशी महिला कैद्यांचा समावेश आहे. अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून मिळाली.
इंग्लंड, साऊथ आफ्रिका, कोलंबिया, ब्राझील, पाकिस्तान, केनिया, इटली, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, ईरान, थायलंड, अफगाणीस्तान, नेपाल, झिम्बॉम्बे आणि नायजेरिया या देशातील सर्वाधिक नागरिक महाराष्ट्रातील कारागृहात बंदिस्त आहेत. राज्यभरातील कारागृहात ६५५ विदेशी नागरिक शिक्षा भोगत असून त्यामध्ये ५४४ पुरुष तर ११० विदेशी महिलांचा समावेश आहे. देशविघातक कृत्य करण्याच्या आरोपात पाकिस्तानी, बांगलादेश, अफगाणीस्तान या देशातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहेत. नायजेरिया, इंडोनेशिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिकेतील नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
हेही वाचा : कंत्राटी भरतीला राज्यभरातील तरुणांचा विरोध, नागपुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन
महिलांमध्येसुद्धा आर्थिक गुन्ह्यासह फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. काही विदेशी महिला-तरुणी पर्यटनासाठी भारतात आल्यानंतर महाराष्ट्रात देहव्यापार करताना आढळल्या आहेत. सेक्स रॅकेटमधील दलालांच्या मध्यस्थीने विदेशी तरूणी देहव्यापारात आढळल्याने कारागृहात बंदिस्त आहेत. घुसखोरी, विनापरवानगी भारतात वास्तव्य करणे किंवा हेरगिरी करण्याच्या आरोपातही काही विदेशी कैदी राज्यातील कारागृहात शिक्षा भोगत आहेत. सर्वाधिक २३८ विदेशी कैदी मुंबई मध्यवर्ती कारागृहात असून ठाणे कारागृहात ११३ विदेशी कैदी ठेवण्यात आले आहेत. तळोजा कारागृहात ९२ तर येरवडा-पुणे कारागृहात ६१ विदेशी बंदी ठेवण्यात आले आहेत. नागपुरातही ६ विदेशी कैदी बंदिस्त असून सर्व आरोपी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आहेत.
कैद्यांमध्ये ११० विदेशी महिला
राज्यभरातील कारागृहात ११० विदेशी महिला कैदी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक विदेशी महिला कैदी मुंबई जिल्हा कारागृहात आहेत. मुंबईत ६७ विदेशी तरुणी असून कल्याण कारागृहात १९ तर ठाणे कारागृहात ११ विदेशी तरुणी कैदी ठेवण्यात आल्या आहेत. पुणे कारागृहात ८ विदेशी महिला बंदिस्त आहेत.
कुटुंबियांच्या संपर्कात विदेशी कैदी
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विदेशात असलेल्या कुटुंबियांच्या संपर्कात राहण्यासाठी कारागृह प्रशासनाने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. काही कैद्यांना जामीन मिळविण्यासाठी कुटुंबीय मदत करीत आहेत तर कुटुंबियांच्या संपर्कात राहणाऱ्या विदेशी महिला कैद्यांमध्ये सकारात्मकता निर्माण झाल्याची माहिती पुणे कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.