अनिल कांबळे
नागपूर : महाराष्ट्रात सर्वाधिक बालगुन्हेगार उपराजधानीत असून बालगुन्हेगारीत राजधानी मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. पोलिसांचा बालगुन्हेगारांकडे बघण्याचा दृष्टिकोन, शासनाकडून बालगुन्हेगारी निर्मूलनासाठी ठोस उपाययोजनांच्या अभावामुळे बालगुन्हेगारी वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक बालगुन्हेगार म्हणजेच विधीसंघर्षग्रस्त बालकांची संख्या नवी दिल्लीत सर्वाधिक आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत दिल्लीतील बालगुन्हेगारीचा दर तब्बल चौपट असून २ हजार ६१८ बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आहेत. महाराष्ट्रात नागपुरात ३५१ बालकांवर गुन्हे दाखल असून याबाबतीत उपराजधानी पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई असून येथे ३३२ बालकांवर गुन्हे दाखल आहेत. पुण्याचा बालगुन्हेगारीत तिसरा (२८८) क्रमांक लागतो.
देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
बालगुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या (४५५४) स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर मध्य प्रदेश (५६८४) तर तिसऱ्या स्थानावर राजस्थानचा (२७५७) क्रमांक लागतो.
का वाढतेय बालगुन्हेगारी?
सध्या राज्यात ४ हजार ५५४ बालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बालगुन्हेगारांचे वय लक्षात घेता त्यांना कारागृहात न ठेवता त्यांना बालसुधारगृहात ठेवण्यात येते. तेथे अनेकदा बालगुन्हेगारी निर्मूलनासाठी सकारात्मक प्रयत्न न करता उलट बालकांवरच अत्याचार केले जातात. बालसुधारगृहातील वातावरणामुळे बालकांतील गुन्हेगारीची भावना कमी होण्यापेक्षा वाढीस लागते. बालगृहातून पळून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय असुरक्षिततेचे वातावरण, मोठय़ा गुन्हेगारांची संगत आणि बदललेली जीवनशैली, घरातील नेहमीची भांडणे, झोपडपट्टीतील अवैध धंदे, त्यांना पोलिसांची साथ, बेरोजगारी किंवा गरिबी अशा विविध कारणांमुळे बालगुन्हेगारांची संख्या वाढत आहे.
बालगुन्हेगारांवर अधिक संख्येने चोरीचे गुन्हे..
बालगुन्हेगारांकडून सर्वाधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. देशभरात ५ हजार ८९९ बालकांवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक गुन्हे दिल्लीत नोंदविले गेले आहेत.