नागपूर: विदर्भात तापमानाचा पारा सातत्याने वर जात असून बुधवारी अकोला शहरात ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे वेगाने वर जाणारा हा तापमानाचा पारा पाहता मार्च महिन्यातील चंद्रपूर शहराचा ४४.२ अंश सेल्सिअसचा विक्रम मोडणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते, पण खऱ्या अर्थाने एप्रिल महिन्यात उन्हाच्या झळा जाणवू लागतात. यावर्षी वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळूनही तापमानाचा पाराही वेगाने वर चढत आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत आणि दूपारी घराबाहेर पाऊल टाकणेही कठीण झाले आहे. एरवी मार्च महिन्यात तापमानात फारशी वाढ नसते, पण यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वेगाने वर जात आहे. मार्च महिन्याच्या मध्यान्हातच विदर्भात तापमानाने चाळीशी ओलांडली. तर आता महिना संपायला चार दिवस बाकी असताना अकोला शहरात ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाळ अमरावती ४१.२, बुलढाणा ४१.०, वर्धा ४०.५ आणि ब्रम्हपूरी ४०.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तर विदर्भातील इतर शहरे देखील चाळीशीच्या जवळ पोहोचली आहेत.
हेही वाचा >>>अजित पवार व शिंदे गटाची अवस्था रस्त्यावरच्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट; वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजपचे गुलाम…’
विदर्भातील मार्च महिन्याचा दशकातील सर्वाधिक तापमानाचा आढावा घेतल्यास ३१ मार्च २०२२ ला चंद्रपूर जिल्ह्यात ४४.२ तर अकोला येथे ३० मार्च २०१७ ला ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ३० मार्च २०१७ ला वर्धा येथे ४३.८, ३१ मार्च २०१९ला नागपूर शहरात ४३.३, अमरावती शहरात ४३.२, यवतमाळ शहरात ४२.५, ३० मार्च २०१७ ला ४२.२ व ३० मार्च २०२२ ला बुलढाणा शहरात ४०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.