लोकसत्ता टीम

अमरावती: देशातला पहिला सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांनी घडवून आणला. अशा पद्धतीच्या लग्नामध्ये अनिष्ट रुढी, मानपान, परंपरा, अनावश्यक खर्चाला विरोध करत साध्या सोप्या पद्धतीने लग्न केले जाते. असाच एक सत्यशोधक पुनर्विवाह जिल्ह्यातील पथ्रोट येथे पार पडला.

दर्यापूर तालुक्यातील भातकुली जैन येथील एमएससी फिजिक्स, बीएड्, तंत्रनिकेतन पदविकाधारक अशी उच्च शिक्षित पल्लवी निमकर व नाशिक विद्यापीठातून एमएसडब्ल्यू, एमबीए झालेले स्वप्निल अंबाडकर हे या सत्यशोधक विवाहातील पुनर्विवाहित वधूवर आहेत. स्वप्निल हे ठाणे येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक असून फुले दाम्पत्याच्या विचारांचे पाईक आहेत.

हेही वाचा… नागपूर : रुग्णालयांनी वाहनतळे गिळली! कुणी उभारले प्रतीक्षा कक्ष, तर कुठे औषध दुकान

सावित्री शक्तिपीठाच्या पुढाकारातून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला सावित्री शक्तिपीठ सत्यशोधक समितीच्या राज्य अध्यक्ष शीला चर्जन, उपाध्यक्ष शारदा गणोरकर, सत्यशोधक चळवळीतील वैभवकुमार निमकर, लेखक जयकुमार चर्जन, अरुण गणोरकर, माधुरी रसे, रामचंद्र चतुर, संजय दोरे, पंकज गणोरकर, संगीता वाठ, राजेश्वरी धुमाळे आदी उपस्थित होते. हा विवाह म्हणजे फुले दाम्पत्याच्या विचारांचे द्योतक असून भविष्यातील सामाजिक बदलाची नांदी असल्याचे मत मांडत सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुळधरण यांनी हा विवाह घडवून आणणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा… बुलढाणा : “न्यायदेवतेचा निर्णय दिशादर्शक अन् स्वागतार्ह”; आमदार रायमूलकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “सभापतींचे संवैधानिक महत्त्व…”

सत्यशोधक चळवळीमध्ये सत्यशोधक विवाह ही संकल्पना विशद केली आहे. पारंपरिक व वैदिक विवाह पद्धतीऐवजी स्वयंपौरोहित्य करून केलेले सत्यशोधक विवाह हे कमी खर्चाचे व समाजाला नवी दिशा दाखवणारे आहे, असे जयकुमार चर्जन यांनी सांगितले.

Story img Loader