लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: अभियांत्रिकीच्या आणि बीएस्सी पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत असलेल्या दोन तरुणींनी झटपट पैसा कमविण्यासाठी आणि कपडे, पब, दारु पार्टी आणि महागडे शौक पूर्ण करण्यासाठी देहव्यापाराच्या दलदलीत उडी घेतली.

दोनही विद्यार्थिनीने बाहेरचा खर्च भागविण्यासाठी चक्क दोन दलालांशी सौदा केला. मात्र, गुरुवारी पोलिसांनी घातलेल्या छाप्यात दोनही विद्यार्थिनी पकडल्या गेल्या. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन दलालांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षांची तरुणी ही एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाला शिकते. तर तिची २० वर्षीय मैत्रिण बी. एस्सी पदवीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे. दोघींनाही महागडे कपडे, दारु पार्टी, पब आणि अन्य शौक आहेत. घरून मोजके पैसे मिळत असल्यामुळे दोघींनाही आर्थिक अडचण होती.

हेही वाचा… नागपूर विद्यापीठाच्या नावावर बनावट पदव्या! चक्क २६ विद्यार्थ्यांनी मिळविली विदेशात नोकरी… वाचा काय आहे प्रकरण?

दोघींची भेट सेक्स रॅकेटचा दलाल लोकेश रोहिणीप्रसाद मिश्रा (३९, झिंगाबाई टाकळी) याच्याशी झाली. त्याने झटपट पैसा आणि शौक पूर्ण करण्यासाठी देहव्यापार करण्याचा सल्ला दिला. त्याने आंबटशौकीन ग्राहक शोधणे सुरु केले आणि दोघीही मागणीनुसार देहव्यापार करीत होत्या. यामध्ये रामदलाल झाऊलाल बंदेवार (४८, योगी अरविंदनगर) हा सलूनचा व्यवसाय करणारासुद्धा सामिल झाला.

हेही वाचा… नागपूर : जिल्ह्यातील पहिले शासकीय तंबाखू मुक्ती केंद्र सुरू

अभ्यंकरनगरातील श्रृंगार ब्युटी पार्लरमध्ये त्याने आंबटशौकीन ग्राहकांना बोलावून दोन्ही विद्यार्थिनींना त्यांच्याशी उपलब्ध करुन देण्यात येत होते. बजाजनगरचे ठाणेदार विठ्ठलसिंह राजपूत यांना माहिती मिळताच त्यांनी दोन बनावट ग्राहक पाठवले. लोकेश मिश्रा याने दोन्ही तरुणींचा ५ हजार रुपयांत सौदा केला. ब्युटी पार्लरमधील रुम उपलब्ध करुन दिली. काही वेळातच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी छापा घातला. दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले. तर लोकेश आणि रामदयाल या दोघांना अटक केली.

विद्यार्थिनींचे आर्थिक शोषण

दलाल लोकेश हा तरुणींचे अर्धनग्न फोटो एका आंबटशौकीन ग्राहकांना व्हॉट्सअपवर पाठवत होता. ग्राहकाकडून तरुणीसाठी ५ हजार रुपये घेत होता. त्यापैकी तरुणीला केवळ १५०० रुपये देत होता. उर्वरित ३५०० रुपये तो स्वत: ठेवत होता. तरुणींच्या ग्राहकांकडून मिळालेली टीपमध्येसुद्धा तो अर्धा हिस्सा घेत होता. अशाप्रकारे दोन्ही तरुणींचे आर्थिक शोषणही दलाल लोकेश मिश्रा करीत होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highly educated young women into prostitution for quick money in nagpur adk 83 dvr