लोकसत्ता टीम
वर्धा: हिंगणघाट येथेच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे म्हणून आता थेट मुंबई येथील आझाद मैदानात लढा सुरू झाला आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या नऊ शासकीय महाविद्यालयाच्या स्थळांमध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. मंजूरी देतांना वर्धेलगत साटोडा येथे जागा निश्चित केली. परंतू वर्धेपेक्षा हिंगणघाटला हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याची अधिक गरज असल्याचा मुद्दा हिंगणघाटकरांनी रेटला. त्यासाठी संघर्ष समिती स्थापन झाली.
आणखी वाचा-यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार; अनेक मार्ग बंद, शाळांना सुट्टी
हिंगणघाट येथे ६० दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाच आता आंदोलकांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. आज आंदोलन मंडपास राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री सुनील केदार व अन्य नेत्यांनी भेट देवून चर्चा केली. जयंत पाटील यांनी विधीमंडळात ही बाब उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दिली. संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर तसेच वासुदेव पडवे, माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, काँग्रेसचे प्रवीण ऊपासे, शिवसेना ठाकरे गटाचे राजू खुपसरे, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, सामाजिक कार्यकर्ते श्याम ईडपवार, सुरेंद्र बोरकर, सुधाकर बंगाले व अन्य आंदोलनस्थळी उपस्थित आहे.