राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला लाखोंच्या संख्येत जनतेकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात असतानाच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मोर्चाचे वर्णन ‘नॅनो’ मोर्चा असे केले. यामुळे शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ ट्वीट करून मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा व्हिडीओ मराठा मोर्चाचा असल्याचं बोललं जात असल्याने, आता यावरून भाजपाकडून संजय राऊतांवरच पलटवार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोलाही लगावला.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या दरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्ष आपलं अस्तित्व दाखवण्याचं प्रयत्न करतोय आणि त्यांचा मोर्चा हा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे, ते या ठिकाणी कुठंतरी मला असं वाटतय की आत्मचिंतन करत आहेत. म्हणूनच आपलं अस्तित्व मोठ्याप्रमाणात मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे हा मोर्चा मी ‘नॅनो मोर्चा’ म्हटला तर त्यावर शिक्कामोर्तबच काल एकप्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडीओ हा त्या मोर्चाचा व्हिडीओ दाखवून जो संजय राऊतांनी ट्वीट केला त्यातूनच हे लक्षात येतय की त्यांचा मोर्चा नॅनो होता, त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे आणि म्हणून अशाप्रकारे हे सगळं चालेलं आहे.”

याशिवाय, संजय राऊतांना ट्वीट केलेल्या व्हिडीओवरून मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसत आहे, यावर बोलताना फडणवीस म्हणाले “हे होणारच आहे, याचं कारण असं आहे, की एकतर मराठा मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नव्हता, तो मराठा समाजाचा मोर्चा होता. त्या मोर्चाला हीच मंडळी होती ज्यांनी मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून अतिशय विभत्स अशाप्रकारे त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या वृत्तपत्रात छापलं आणि आता पुन्हा तेच लोक त्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करतात आणि मग वर मुजोरी करतात की महाविकास आघाडीने तो मोर्चा काढला होता, आम्ही त्यामध्ये होतो. त्यामुळे हे मराठा समाज सहन करणार नाही. असा कोणीही त्याचा राजकीय उपयोग करू नये, तो केला जातोय त्यामुळे साहाजिकच मराठा समाज त्याबद्दल आक्रमक आहे.”

हेही वाचा – “आता चक्क ‘नॅनो’ मोर्चाचं अपयश झाकायला थेट मराठा मोर्चाचा आधार घेतला?” चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला!

संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत भगवे झेंडे हातात घेतलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी महामोर्चात आलेल्या लोकांनी केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. याशिवाय त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “देवेंद्र फडणवीस ज्यास ‘नॅनो’ मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. मात्र या व्हिडीओवर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. या व्हिडीओची मी पडताळणी करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Story img Loader