नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागात आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. नागपुरात मात्र उन्ह, वादळ, मुसळधार पाऊस अंगावर झेलत चाळीस ते साठ वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी उभारलेले पुतळे अजूनही सुस्थितीत आहेत. त्यात गीता मंदिरापुढील ‘शिवराज फाईन आर्ट लिथो-ऑफसेट वर्कस्’च्या इमारतीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह इतर अनेक पुतळ्यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गीता मंदिरापुढील ‘शिवराज फाईन आर्ट लिथो-ऑफसेट वर्कस्’च्या इमारतीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण ६ जानेवारी १९५९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. ६५ वर्षे झाले तरी शिवाजी महाराजांचा हा पुतळा सुस्थितीत आहे. चित्र सम्राट व लिथो आर्टिस्ट दत्ताजी रामजी उपाख्य दादासाहेब धनवटे यांनी शिवराज लिथो वर्क्स या मुद्राणालयाची स्थापना ११ मे १९२१ ला केली होती. त्यानंतर तीन मजली क्लॉक टॉवर इमारत उभारली गेली. दादासाहेब धनवटे यांची शिवरायाची भव्य प्रतिमा असावी अशी इच्छा होती. त्यांनी दिल्लीतील प्रख्यात शिल्पकार सदाशिवराव साठे यांना जबाबदारी दिली. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वच राजकीय नेते नागपुरात असताना तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. आज इमारत मोडकळीस आली आहे मात्र पुतळा सुस्थितीत आहे.

हेही वाचा…मोठी बातमी! मोहन भागवत यांना मोदी, शहांच्या दर्जाची सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

सेंट्रल ॲव्हेन्यूवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा २२ फेब्रुवारी १९७६ मध्ये बसवण्यात आला. पुतळ्याच्या लोकार्पणाला त्यावेळी नेताजींचे धाकटे बंधू शैलैशचंद्र बोस उपस्थित होते. त्यालाही ४७ वर्षे झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण ११ जुलै १९७६ ला तत्कालीन उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्या हस्ते झाले होते. या पुतळ्याला ४८ वर्षांचा इतिहास आहे. याशिवाय व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांचा पुतळा, मस्कासाथ परिसरातील पं. जवाहरलाल नेहरू, लक्ष्मीभवन धरमपेठ परिसरातील लालबहादूर शास्त्री, मुंजे, संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, कॉटेन मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा, झेंडा चौकातील शहीद शंकर महाले, महाराजबाग चौकातील कृषी महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, मस्कासाथ परिसरातील डॉ. राजेंद्र प्रसाद , चिटणीस पार्क चौकातील कामगार नेते रामभाऊ रुईकर, शंकरनगरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर, घाट रोड मार्गावरील सरदार वल्लभाई पटेल, विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाजवळील झाशी राणी लक्ष्मीबाई, आनंद टॉकिज परिसरातील क्रांतिवीर नारायणसिंग उईके, मेयो रुग्णालयाजवळील शहीद कृष्णराव काकडे, महापालिकेतील बॅ. शेषराव वानखेडे, गांधीसागर तलावाजवळील लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक पुतळे अनेक वर्षांपासून सुस्थितीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historic statues in nagpur stand strong for decades while new statue of chhatrapati shivaji maharaj collapses in sindhudurg vmb 67 psg