नागपूर : सर्व माध्यमाच्या तसेच सर्व मंडळाशी संबधीत शाळातील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगलिक, सांस्कृतीक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येत असते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करताना खालील प्रमाणे दक्षता घेण्यात यावी असे आदेश शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी काढले आहेत. हे आदेश काय आहे, आपल्या पाल्याची सुरक्षा कशी करता येईल यावर उपाययोजना सूचवल्या आहेत.
नवीन नियमावलीचे कारण काय?
शंकरनगरच्या सरस्वती विद्यालयातील सहलीला निघालेल्या ट्रॅव्हल्स बसचा हिंगणाजवळ अपघात झाला. सरस्वती शाळेची सहल घेऊन निघालेल्या सहाही खासगी बसच्या चालकांनी नागपूर-वर्धा या मुख्य रस्त्यावरील पथकर वाचवण्यासाठी धोकादायक घाट वळण असलेला पेंढरी-देवळी मार्ग निवडला. पथकराचे केवळ ३६०० रुपये वाचवण्यासाठी जवळपास तीनशेवर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे जात होती. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाने प्रत्येक विद्यार्थ्याकडून पैसे घेतले होते. बोरधरणला जाण्यासाठी नागपूर ते वर्धा मुख्य मार्ग आणि नागपूर ते पेंढरी-देवळी घाट मार्ग असे दोन पर्याय होते. मात्र, नागपूर ते वर्धा या मुख्य रस्त्याने शाळेच्या बसेस नेल्यास बुटीबोरीनंतर काही किलोमीटर बोरखेडी पथकर नाका होता. प्रत्येक बसला जवळपास ३०० रुपये कर लागला असता. अशाप्रकारे ३६०० रुपये कर भरावा लागला असता. ती रक्कम वाचवण्यासाठी सहाही बसेस धोकादायक असलेल्या पेंढरी-देवळी घाट मार्गाने घेण्यात आल्या. तेथेच चुकले आणि अपघात घडला.
हेही वाचा…निवडणुकीच्या घुसळणीत काही नव्या चेहऱ्यांचा उदय, लोकांना आस.
अशी आहे नवी नियमावली
एका वर्षात एकच शैक्षणिक सहल आयोजित करण्यात यावी.
विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती करण्यात येवू नये.
विद्यार्थी व पालकांचे संमती पत्र घेण्यात यावे, तसेच सहभागी विदयार्थ्यांची यादी व संपर्क क्रमांक सोबत सलग्न करण्यात यावा.
शाळा व्यवस्थापन समिती शाळा समिती यांच्या समंतीच्या ठराव घेवूनच सहलीचे आयोजन करण्यात यावे.
सहलीसाठी १० विदयार्थ्यांसाठी एक या प्रमाणात शिक्षकांची संख्या असावी.
विद्यार्थ्याच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी संबंधीत विदयालयाचे मुख्याध्यापक तसेच सहलीतील सर्व शिक्षक यांची राहील.
सहलीस विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका सोबत असणे अत्यावश्यक राहील.
सहल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसनेच नेण्यात यावी.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी जादा शुल्क आकारू नये.