बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या नव्वदीच्या दशकापासूनचा इतिहास लक्षात घेतला तर बहुतेक लढतीत मतविभागणी व ‘अँटी इन्कबन्सी’ अर्थात सत्ताविरोधी लाट हे दोन घटक निकालात निर्णायक ठरले आहे. यंदाही ते महत्त्वाचे ठरणार असून कोणाला तारक, कोणाला मारक ठरतात, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सन १९८९ पासूनच्या लढतीपासून लोकसभा निवडणुकीत हा ‘ट्रेंड’ सुरू झाला. त्यापूर्वी समोर जनसंघ, शेकाप कोणीही असो, काँग्रेसचा विजय निश्चित, असा एकतर्फी मामला होता. कालानुरूप लोकसभा लढतीत मतविभाजन, सुप्त लाट, ‘अँटी इन्कबन्सी’ हे घटक निकाल ठरवू लागले. १९८४ च्या लढतीत सहज विजय मिळविणाऱ्या मुकुल वासनीक यांना १९८९ च्या लढतीत विरोधी लाटेचा फटका बसला. त्यामुळे सुखदेव काळे निवडून आले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या क्रूर हत्येने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे १९९१ मध्ये वासनीक यांना तारले. १९९६ मध्ये ते नकोच म्हणून आनंदराव अडसूळ विजयी झाले. २०१४ च्या लढतीत नरेंद्र मोदी लाटेने युतीला तारले. सुप्त वा उघड विरोधी लाटेची ही उदाहरणे ठरली. १९९९ पासून आघाडीला बमसं व बसपा, प्रबळ अपक्षांमुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका बसला. २०१९ च्या लढतीत वंचितने १ लाख ७२ हजार मते घेत आघाडीच्या पराभवात मोठा वाटा उचलला. मात्र यंदाचे विचित्र मतविभाजन युतीलाही फटका देणारे ठरू शकते, अशी चिन्हे आहेत.
यंदाच्या निकालातही विभाजन व विरोधी सुप्त लाट निर्णायक घटक ठरणार असल्याचे आत्ताच स्पष्ट झाले आहे. सलग १५ वर्षे खासदार असणे व विकासकामे, जनसंपर्क या कसोटीवर न उतरल्याने प्रतापराव जाधव यांच्या विरोधात ‘अँटी इन्कबन्सी’ची लाट आहे. पंधरा वर्षांत नेमके काय केले? या विरोधकांच्या प्रश्नावर खासदारांकडे ऊत्तर नाही. असले तरी त्याने मतदारांचे समाधान होणारे नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मतदार उघड नाराजी बोलून दाखवीत आहेत. दुसरीकडे, बुलढाणा आपल्याला सुटला नाही म्हणून भाजपा प्रचंड नाराज आहे. खुद्द भाजपाच्या लोकसभा निवडणूक प्रमुखाने भरलेला अर्ज याचे प्रतीक आहे. खामगावच्या मेळाव्यात आमदार आकाश फुंडकर यांनी व्यक्त केलेली नाराजी बोलकी व प्रातिनिधिक ठरावी. यामुळे भाजपाचे गठ्ठा मतदान काही प्रमाणात अन्यत्र वळण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाच्या मतांचे विभाजन अटळ
सामाजिक समीकरण लक्षात घेतले तर सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या मराठा समाजाचे मतविभाजन अटळ आहे. कुणबी, पाटील, देशमुख, वायंदेशी, धनवटे मिळून सकल मराठा समाजाचे सहा लाखांच्या आसपास मतदान आहे. मात्र रिंगणात जाधव, ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके हे चार उमेदवार असल्याने हे गठ्ठा मतदान विभागणार, हे उघड आहे. ही विभागणी कुणाच्या पारड्यात जास्त हा देखील महत्वाचा घटक आहे. यामुळे वंचितने वसंतराव मगर यांच्या रूपाने मोठ्या संख्येतील माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. याचा फटका युतीला बसणार आहे. मगर यांना स्वजातीय, वंचितचे इतर आणि आंबेडकरी समाजाची किती मते पडतात यावर त्यांची भिस्त आहे. मात्र त्यांना जास्त मते म्हणजे आघाडीला धोका आहे. रिंगणातील रविकांत तुपकर व संदीप शेळके हे अपक्ष प्रबळ समजले जात आहे.
हेही वाचा – बुलढाण्यात महायुतीत महाफूट, भाजप लोकसभा प्रमुखांचे बंड; उमेदवारी अर्ज दाखल
तुपकरांना ग्रामीण भाग, शेतकरी वर्गात सहानुभूती मिळत आहे. त्यांनी सोयाबिन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सतत केलेली आंदोलने त्यांच्या जमेची बाजू आहे. मागील दोन वर्षांपासून कामाला भिडलेले संदीप शेळके यांनी मिशनच्या माध्यमाने राबविलेलेले उपक्रम, परिवर्तन रथ यात्रेला मिळालेला प्रतिसाद, खासदाराविरुद्ध पुकारलेला एल्गार, शाहू पतसंस्था परिवाराचे नेटवर्क ही त्यांची ताकद आहे. या दोघांनाही मिळणारी मते व त्यामुळे होणारे विभाजन कुणाला फटका देते हे पाहणे रंजक ठरणार आहे. उमेदवार आणि युती- आघाडीमधील घडामोडी लक्षात घेता प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच बुलढाण्याची लढत चौरंगी वळणाकडे निघाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
विकास मुख्य मुद्धा पण…
दरम्यान प्रा. खेडेकर, तुपकर, मगर व शेळके या सर्वांनी विकासाला मुख्य मुद्धा केला आहे. त्यावरून जाधव यांना घेरण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. यामुळे विकास हा लढतीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. मात्र विरोधी लाट, यावेळी अपारंपरिक पद्धतीने होणारे मत विभाजन हे देखील कळीचे मुद्दे ठरणार हे नक्की!