लोकसत्ता टीम
नागपूर : मद्याच्या नशेत भरधाव कार चालवून दोन तरुणांना चिरडणाऱ्या रीतिका ऊर्फ रितू मालूला तहसील पोलिसांनी मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालनाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पोलीस कोठडीची विनंती फेटाळून लावली आणि रितूला जामीन मंजूर केला. या प्रकरणात वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर तहसील पोलीस वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे.
अपघाताची ही घटना २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री रामझुल्यावर घडली होती. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४) रा. नालसाहब चौक व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४) रा. जाफरनगर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी तहसील पोलिसांनी कारचालक रितू मालू आणि माधुरी सारडा (३७) रा. वर्धमाननगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी कलमात वाढ केल्यापासून रितू रहस्यमयरित्या गायब झाली होती. तिने चार महिने पोलिसांना गुंगारा दिला. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध पथके तयार करून शहरात आणि राज्यात तसेच राज्याबाहेर तिचा शोध घेतला. तिच्या माहेरी सुध्दा दोन पथके जाऊन परतली. मात्र, रितू कुठे मिळून आली नाही. कुटुंबीय आणि वकीलांशी चर्चा केल्यानंतर ती एक जुलै रोजी पोलिसांना शरण आली. पोलिसांनी तिला अटक करून एक दिवस ताब्यात ठेवले.
आणखी वाचा-‘लाडक्या बहिणीं’ची माहितीअभावी धडपड सुरूच; वाशीम जिल्ह्यात उत्पन्न दाखल्यासाठी महिलांची पुन्हा गर्दी
विशेष म्हणजे मद्यधुंद असल्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यामुळे रीतिकाला अटक होण्याची दाट शक्यता होती. परंतु, रीतिकाने सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून अटकपूर्व जामीन मागितला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. परिणामी, तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही नामंजूर केला होता. आता ती स्व:तच पोलिसांना शरण आल्याने पोलीस कोठडी घेऊन सखोल तपासणी करण्याच्या तयारीत पोलीस असताना न्यायालयाने तिचा जामिन मंजूर केला. अर्थात रितीकाला तांत्रिक नियमांचा फायदा मिळाला आहे. तिला अटक करण्यापूर्वी संबंधित न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते. पोलिसानी ती प्रक्रियाच केली नाही.
आर्थिक सहकार्य कुणी केले
ती चार महिने कुठे होती, तिला आर्थिक सहकार्य कोणी केला, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. माहेरी राजस्थानच्या ब्यावर येथे असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अर्थातच ती पोलिसांची दिशाभूल करीत आहे. यासह अनेक प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी तहसील पोलिसांनी न्यायालयात रितूला हजर केले. तिच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने पोलीस कोठडी देण्यास नकार देत तिला जामीन मंजूर केला.