नागपूर : बहुचर्चित रामझुला हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितू मालू हिचा पती दिनेश मालूला नागपूर सत्र न्यायालयाने दिलासा दिला. रितू मालू हिला मदत केल्याप्रकरणी प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी दिनेश मालूचा जामीन मंजूर केला होता. याविरोधात तहसील पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. सत्र न्यायालयाने सोमवारी पोलिसांची ही याचिका फेटाळत दिनेश मालूला  दिलासा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामझुला हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितू मालू हिला अपघातानंतर दिनेश मालूने मदत केली असल्याचा आरोप आहे. तहसील पोलिसांनी मागील आठवड्यात दिनेशवर पुरावे नष्ट केल्याच्या तसेच आरोपीला मदत केली असल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र दिनेशला प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केल्यावर त्यांनी पोलिस कोठडी देण्यास नकार दिला. न्यायालयाने आरोपीचा जामीनही मंजूर केला होता. यानंतर तहसील पोलिसांनी नागपूर सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली.

हेही वाचा >>> नागपूर विमानतळावर ‘बॉम्ब ,’एका आठवड्यात दुसरा मेल, यंत्रणा सतर्क

सरकारी वकील ॲड.रश्मी खापर्डे यांनी दिनेश मालूला अटक करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. अपघातानंतर दिनेशने वाहनातील मद्याच्या बाटल्या आणि कागदपत्रे बाहेर फेकली. रितूला घटनास्थळावरून पळवण्यात देखील दिनेशने मदत केली. रितूच्या रक्तातील मद्याचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याने औषधीची व्यवस्था केली. रितू मालूचा फोनचा पासवर्ड उघडण्यात दिनेशने तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही. घटनेनंतर रितूला जवळच्या मेयो रुग्णालयात नेण्याऐवजी दिनेशने खासगी रुग्णालयात नेले. त्यामुळे घटनेनंतरचे अनेक पुरावे नष्ट झाले, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दुसरीकडे, दिनेश मालू यांचे वकील ॲड.प्रकाश जयस्वाल यांनी सांगितले की अपघातानंतर त्याने केवळ पतीचे कर्तव्य पूर्ण केले. शासकीय रुग्णालयातील दुरवस्था बघता रितूला खासगी रुग्णालयात नेले. तपास अधिकाऱ्यांना आपला भ्रमणध्वनी क्रमांक देत तपासात सहकार्य केले. दिनेशला याप्रकरण विनाकारण अडकवण्यात येत आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे दिनेशवर गुन्हा नोंदविला, असा युक्तिवाद ॲड.जयस्वाल यांनी केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर सत्र न्यायालयाने पोलिसांची याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा >>> वर्धा : दारूडा ‘त्याला’ दगडाने ठेचत होता; लोकांची मात्र बघ्याची भूमिका! काही जण व्हिडिओ काढण्यात व्यग्र…

उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

आरोपी रितू मालू हिच्या अटकपूर्व जामीन प्रकरणावर उच्च न्यायालयात मागील आठवड्यात युक्तिवाद पूर्ण झाला. याप्रकरणी उच्च न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला आहे. उच्च न्यायालय याप्रकरणी कधी निर्णय देणार याबाबत स्पष्टता नाही. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ अधिवक्ते सुनील मनोहर यांनी जोरदारपणे रितूची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता तर दुसरीकडे सरकारी वकील ॲड.देवेंद्र चव्हाण यांनी रितू विरोधातील सर्व पुरावे सादर केले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run case in nagpur court again gives relief to the accused ritu malu husband tpd 96 zws