नागपूर : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज कार सुसाट चालवून दोन तरुणांचा बळी घेणाऱ्या रीतिका ऊर्फ रितू मालू हिने सोमवारी दुपारी तहसील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. फरार असलेल्या रितीकाचा शोध गुन्हे शाखा आणि तहसील पोलीस घेत होते. ती दुपारी १ वाजता अचानक तहसील पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी तिला अटक केली. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> नागपूर : उच्च न्यायालयाने थेट पोलीस निरीक्षकाच्या नावावर काढले वॉरंट – जाणून घ्या काय आहे प्रकरण…
गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगार देणारी रितिका पोलिसांना गवसत नव्हती. तिच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आले होते. मात्र, ती पोलिसांना सापडत नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. रितिका आतापर्यंत कुठे होती?, या दरम्यान तिला कुणी मदत केली?, अर्थसाहाय्य कुणी केले?, ती कोणाच्या संपर्कात होती?, याशिवाय घटनेसंबंधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची असल्याने तिची पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली, तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे तिचे ‘लोकेशन’ सतत मिळविले जात होते. याशिवाय नातेवाईकांचे मोबाईल ‘सर्व्हिलन्स’वर ठेवण्यात आले होते. सगळीकडून कोंडी होत असल्यामुळे रितूकडे कुठलाच पर्याय उरला नव्हता. त्यामुळे तिने सोमवारी दुपारी १ वाजता तहसील पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. तिच्या अटकेमुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.