लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर : संपूर्ण राज्यभरात दिवसेंदिवस ‘हिट अँड रन’च्या घटना वाढत आहेत. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अशा अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशीच एक घटना गोंदिया शहरातून समोर आली आहे. या घटनेत भरधाव कारचा थरार बघायला मिळाला असून रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोघांना आणि सायकलस्वाराला या भरधाव कारने चक्क हवेत उडविले आहे. या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे.
गोरेगाववरून गोंदियाकडे येत असताना गोंदियातील पॉलिटेक्निक कॉलेज समोर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर आणि एक सायकलस्वाराला उडवले आहे. या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर आणि सायकलस्वार गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गोंदियात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.
आणखी वाचा-ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
काय आहे नेमकी घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक भरधाव वेगाने गोंदिया शहरातील गणेशनगरकडे जात असताना होता. ही कार खोमेश उरकुडे (वय २४ वर्ष रा. कोसेटोला, गोरेगाव) हा चालवत होता. कारचा वेग भयानक होता. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे चालक खोमेश गोंधळला. त्याने रस्त्याच्या कडेला बसलेला ट्रकचालक हेमराज राऊत (वय ५४ रा. कारंजा ) आणि कादीर शेख (वय ३८ रा. फुलचूर) आणि एक सायकलस्वाराला जबर धडक दिली. ही कार इतकी वेगात होती की त्यातील एक व्यक्ति लांबवर हवेत उडाल्याचेही बघायला मिळाले आहे. तीनही जखमींवर गोंदियातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे अनेक व्हॉट्सअप ग्रूपवर या हिट अँड रनचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित होत आहे. अनेकांनी अपघाताचा थरार बघितला आहे.
आणखी वाचा- अबब… आठ फुटांचा लाकडी बैल… नागपुरातील तान्हा पोळ्याचा असा आहे इतिहास…
पोलिसांनी गांभीर्य दाखवावे
शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. वाहतूक पोलिसांचा वचक वानहचालकांमध्ये नाही. वाहतूक पोलीसही नाममात्र कारवाई करून कर्तव्य निभावतात. पोलिसांच्या या भूमिकेमुळेच वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करतात. वाहतूक पोलिसांनी जर थोडे गांभीर्य दाखविल्यास शहरातील अपघाताचे प्रमाणही कमी होईल आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल. या प्रकरणी पोलिसांनी लगेच कारचालकाची पोलीस कोठडी घ्यावी आणि या प्रकरणाचा लवकर तपास करून आरोपी कारचालकास शिक्षा व्हावी, अशी तजवीज करावी.